एक्स्प्लोर

BLOG | पंडित नेहरु : निर्विवाद नायक

Jawaharlal Nehru birth anniversary | नेहरुंची प्रासंगिकता मोठी आहे. मग ती समर्थनार्थ असो वा विरोधात. देशात लोकशाही, उदारता, धर्मनिरपेक्षता, संविधानातील मूल्ये रुजवली आणि वाढवली. त्याचेच फळ आज आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रुपात चाखत आहोत. आजच्या सत्तेच्या महाभारतात नेहरुंना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय. पण सत्तर वर्षे मागे जाऊन पाहिल्यास नेहरु हे निर्विवाद नायक होते हे समजते.

"आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्य आणि सत्तेसोबत आता जबाबदारी आली आहे. ही जबाबदारी सार्वभौम देशाच्या सार्वभौम नागरिकांवर आहे. आपण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी असंख्य वेदना सहन केल्या. त्याची आठवण जरी आली तरी कंठ भरुन येतो. अजूनही दुख संपले नाही. आता आपले भवितव्य आपल्या हाती आहे. त्यामुळे आता आराम करायचा नाही तर नवीन भारत घडवण्यासाठी परिश्रम करायचे आहे. गरिबी, अज्ञानता, अनारोग्य, असमानता नष्ट करायची आहे. प्रत्येक डोळ्यांतील अश्रू पुसायचे आहेत. हेच महात्मा गांधींचे स्वप्न आहे. ते आपल्याला सत्यात आणायचे आहे." हे शब्द आहेत भारताच्या पहिल्या पंतप्रधानांचे, जवाहरलाल नेहरु यांचे.

भारताला औपचारिक स्वातंत्र्य मिळायला काही क्षणाचा अवधी राहिला होता. मध्यरात्री देशाची ऐतिहासिक संसद भरली होती. त्यावेळी नेहरुंनी त्यांचे प्रसिद्ध 'नियतीशी करार' हे भाषण केले आणि त्यांच्या स्वप्नातील आधुनिक भारत निर्माण करण्याचा निश्चय केला.

पंडित नेहरुंनी ज्यावेळी भारताच्या सत्तेची कमान स्वत:च्या खांद्यावर घेतली त्यावेळची भारताची परिस्थिती अत्यंत भयानक होती. जगाच्या नकाशावर नुकताच जन्म घेतलेल्या भारताला फाळणीच्या वेदना सहन कराव्या लागल्या. पंजाब आणि बंगालच्या सीमांवर भयंकर रक्तपात होत होता. 'फोडा आणि राज्य करा' या नीतीने ब्रिटीशांनी भारताचे लचके तोडले होते आणि भारतीयांच्या हाती सत्ता सोपावताना एक गरीब, भूक आणि उपासमारीची समस्या असणारा, धर्माच्या नावावर हिंसा होणारा, सर्वत्र रक्ताने माखलेला आणि एकात्मतेच्या आड येणाऱ्या जातीच्या भिंती उभ्या असलेला भारत मागे सोडला होता.

त्यातच संस्थानांच्या, प्रांतांच्या, भाषेच्या समस्या वेगळ्याच होत्या. दीडशे वर्षे पारतंत्र्यात घालवलेला देश आपल्या पायावर उभा राहायचे विसरुन गेला आहे असंच जगाला वाटायचे. ब्रिटनचे पंतप्रधान विस्टन चर्चिल यांनी तर जाहीरच केलेलं की काहीच वर्षात भारताचे अनेक तुकडे होतील. भारताने ब्रिटनकडून उसनी घेतलेली लोकशाही काही वर्षातच संपेल, लोकशाहीचा मुखवटा गळून पडेल आणि तिथे हुकुमशाही येईल. काहींच्या मते तर भारत अशा नावाचा भूतकाळात कोणताही देश नव्हता आणि भविष्यातही राहणार नाही. त्यावेळी खरोखरच तशी परिस्थिती होती. भारताची फाळणी झाली होती आणि अनेक भाषा, धर्म आणि प्रांतामुळे कदाचित भविष्यातही भारताचे बाल्कनायझेशन होईल असाच कयास जागतिक तज्ञांचा होता.

त्यावेळच्या जागतिक दिग्गजांचे मत खोटे ठरवत विविधतेने नटलेला महाकाय भारत आजही टिकला, त्याचे स्वातंत्र्य आज पंचाहत्तरीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. भारताची लोकशाहीही सदृढ आहे, ती वाढतेय. जगातील सर्वात मोठी लोकशाही असे बिरुद भारत मिरवतोय. याचे कारण एकच आहे, ते म्हणजे स्वांतत्र्यानंतर भारताला पंडित जवाहरलाल नेहरुंचे मिळालेले नेतृत्व.

पंडित नेहरुंचे नेतृत्व हे स्वातंत्र्य चळवळीच्या मुशीत, गांधींच्या मार्गदर्शनाखाली घडले होते. एका सुखवैभव घरात जन्मलेल्या जवाहरलाल नेहरुंचे शिक्षण युरोपात झाले. तिथे त्यांच्यावर युरोपियन व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाची प्रभाव पडला. भारतात आल्यानंतर इथली परिस्थिती बघून त्यांची चिकित्सा सुरु झाली. गडगंज श्रीमंती असतानाही त्यांनी स्वत:ला स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिले. 1917 साली होमरुल लीगच्या आंदोलनात त्यांनी भाग घेतला. पण खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात ही गांधींच्या असहकार आंदोलनाच्या माध्यमातून झाली. त्याचवेळी त्यांना पहिल्यांदा तुरुंगवास भोगावा लागला. सायमन कमिशनच्या विरोधातही त्यांनी आंदोलन केले.

समाजवादी विचारांची पेरणी तो काळ रशियाच्या साम्यवादी क्रांतीने भारावलेल्या जगाचा होता. पहिल्या महायुद्धानंतर रशियात साम्यवादी क्रांती झाली आणि तिचा प्रभाव सर्व अविकसित आणि पारतंत्र्यातील देशांवर पडला. भारतातले तरुणही यातून सुटले नाही. त्यामुळे कॉंग्रेसच्या गटाअंतर्गत डाव्या विचारांचा एक तरुण गट तयार झाला. त्याचे नेतृत्व हे जवाहरलाल आणि सुभाषबाबूंकडे आले.

1929 साली कॉंगेसच्या लाहोर अधिवेशनाच्या अध्यक्षपदी जवाहरलाल नेहरुंची वर्णी लागली आणि देशातील तरुणांच्यात एक वेगळाच उत्साह संचारला. नेहरुंनी त्यावेळी पूर्ण स्वराज्याचा नारा दिला आणि स्वातंत्र्य आता लांब नसल्याचे लोकांना ध्यानात आले. 1931 साली कॉंग्रेसच्या ऐतिहासिक कराची अधिवेशनात मूलभूत हक्कांचा ठराव पास करण्यात आला. त्यावेळी नेहरु म्हणाले की, "भारतात कोणत्याही जाती धर्माचा भेद न करता सर्वांना समान सामाजिक आणि आर्थिक हक्क असतील. स्वातंत्र्य भारतात धार्मिक सहिष्णुता म्हणजे सर्व धर्मांना सन्मान मिळेल."

नेहरुंच्या नेतृत्वाखालीच 1936 साली पहिल्यांदाच कॉंग्रेसचे अधिवेशन फैजपूर या खेडेगावत झाले. सुभाषबाबू ज्यावेळी कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यावेळी त्यांनी नेहरुंच्या नेतृत्वाखाली नियोजन आयोगाची स्थापना केली. नेहरुंनीही नियोजन आयोगांतर्गत कृषी, उद्योग, आरोग्य, बँकिंग, भूमीसुधारणा अशा अनेक उपसमित्या नेमल्या आणि एक विस्तृत अहवाल सादर केला. त्यावेळी नेहरुंच्या बुद्धीची झलक भारतीयांबरोबरच ब्रिटीशांनाही दिसली.

1936 साली नेहरु युरोपच्या यात्रेवर गेले आणि त्यांच्या समाजवादी विचारसरणीत स्पष्टता आली. भारताच्या गरिबी आणि उपासमारीवर केवळ समाजवादच हा उपाय आहे असे त्यांचे ठाम मत झाले. पुढे देश स्वातंत्र्य झाल्यावर त्यांनी समाजवादी समाजरचना स्वीकारली आणि अवजड उद्योग उभारणीत सरकारने मोठा वाटा उभारला. नियोजन आयोगाच्या माध्यमातून त्यांनी भारताच्या नियोजनात्मक विकासाचा पाया रचला. तसेच त्यांनी अनेक आतंरराष्ट्रीय समाजवादी परिषदांस उपस्थिती लावली.

पंतप्रधान म्हणून देशातील नागरिकांना आवाहन करताना ते म्हणाले की, "कोणत्याही देशाचे पहिले कर्तव्य हे स्वातंत्र्याला मजबूत करणे हे आहे. त्यामाध्यमातून देशाची एकता आणि अखंडता कायम ठेवावी लागेल. जेव्हा देशाचे नागरिक आपला परिवार, शहर, भाषा, धर्म, प्रांताला देशाच्या वरती ठेवतील त्यावेळी देशाची घसरणूक सुरु होईल. त्यामुळे अशा दुर्बलतेला देशातून हद्दपार करणे हे प्रत्येक नागरिकाने पक्के करावे."

'तीन मूर्ती' या नेहरुंच्या निवासस्थानाच्या परिसरात एक भलेमोठे झाड होते. त्या काळच्या नेत्यांनी त्या झाडाला नेहरु असे नाव दिले होते, कारण ते झाड थोडे डावीकडे झुकले होते. नेहरुंना वाटायचे की नागरिकांनी त्यांना पंतप्रधान न म्हणता 'प्रथम सेवक' म्हणावे.

पक्षनिरपेक्ष राजकारणाचे जनक नेहरु जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी केवळ 12 मंत्र्यांचे मंत्रिमंडळ निर्माण केले. त्यातील पाच मंत्री असे होते की त्यांचा कॉंग्रेसच्या विचारसरणीशी कोणताही संबंध नव्हता. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक नाव होते. हिंदू महासभेच्या श्यामा प्रसाद मुखर्जींचाही त्यात समावेश होता. नेहरुंनी भारताच्या राजकारणाला पक्षोत्तर आणि उदार नजरेने पाहिले. ते म्हणायचे की, "भारतात अनेक धर्म, जाती, प्रांत असले तरी आपला देश एक आहे. आपण सर्वप्रथम भारतीय आहोत. सहयोग, सहिष्णुता आणि शांती ही भारताच्या हजारो वर्षाची परंपरा आहे. आता आपला देश स्वातंत्र्य झाला आहे. अशावेळी प्रत्येकाला सोबत घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्यावर आहे."

लोकशाही मुरवली आणि बळकट केली ब्रिटीश भारत सोडून गेले त्यावेळी भारताची लोकसंख्या जवळपास 35 कोटी इतकी होती आणि साक्षरतेचे प्रमाण केवळ 18 टक्के इतके होते. अशा वेळी लोकशाही स्वीकारायची हे मोठं धाडसच. इतकी कमी साक्षरता असलेल्या देशात नेहरुंनी पहिली निवडणूक जाहीर केली आणि प्रौढ मताधिकाराची घोषणा केली. धर्म, जात, पंत, लिंग कोणतेही असो प्रत्येकाला एका मताचा अधिकार मिळाला, जे त्यावेळी युरोपात आणि अमेरिकेतही नव्हते. निवडणुकीची तातडीने गरज का असे विचारल्यावर ते म्हणायचे की, "भारत आता स्वातंत्र्य झाला आहे आणि या स्वातंत्र्य देशाच्या नागरिकांना त्यांचे सरकार निवडायचा अधिकार आहे."

नेहरुंनी स्वातंत्र्यानंतर भारताच्या लोकशाहीचा ढाचा बळकट करण्यासाठी पाच प्राथमिकता आखल्या. संसदीय लोकशाहीच्या माध्यमातून लोकांनी त्यांचे प्रतिनिधी निवडायचे. देशात धर्मनिरपेक्षता मूल्याची अंमलबजावणी करुन सर्व धर्माच्या नागरिकांना सन्मान मिळवून द्यायचा. योजनाबद्ध विकास करायचा आणि आधुनिक भारताची निर्मीती करायची. वैज्ञानिक दृष्टीकोनाचा स्वीकार करायचा आणि विज्ञानाच्या मार्गावर वाटचाल करायची. समाजवादाच्या माध्यमातून गरिबी आणि उमासमारी नष्ट करायची. या पाच प्राथमिकतेच्या माध्यमातून त्यांनी भारताला महासत्तेच्या मार्गावर घेऊन जाण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यासाठी काही संस्थाची निर्मिती केली.

भारताची त्यावेळची स्थिती लक्षात घेता आधुनिक भारताच्या निर्मीतीत अनेक अडचणी होत्या. त्यावर नेहरुंनी उपाययोजना केल्या. त्यांनी देशात पारदर्शक निवडणुका पार पडण्यासाठी 1950 सालीच निवडणूक आयोगाची स्थापना केली. 1950 साली नियोजन आयोगाची स्थापना करुन नियोजनबद्ध विकासाचा पाया रचला. त्यात अनेक तज्ञांचा समावेश करुन विकासाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. 1950 साली खरगपूर येथे भारतातील पहिल्या आयआयटीची स्थापना केली. त्यांच्या कार्यकाळात आणखी चार आयआयटींची स्थापना करण्यात आली. आज या संस्थतून बाहेर पडणारे विद्यार्थी उच्च गुणवत्ता असणारे म्हणून जगभर ओळखले जातात. 1956 साली एम्सची निर्मिती केली. 1958 साली डीआरडीओची स्थापना केली.

1948 साली नेहरुंनी होमी भाभांच्या मदतीने अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. त्यामाध्यमातून अणुशक्तीचा सृजनात्मक उपयोग करुन स्वत:ची सुरक्षा भक्कम करण्यावर भर दिला. आज जगभर भारताची ओळख एक अणुशक्ती म्हणून आहे. तसेच विक्रम साराभाईंच्या मदतीने इस्रोची स्थापना केली आणि अंतराळ संशोधनाचा पाया रचला.

रशियाच्या मदतीने भिल्लाई येथे स्टील कारखाना सुरु केला. 1956 साली ओएनजीसीची स्थापना केली. 1963 साली भाक्रा नांगल धरण बांधले. नेहरु इंडियन सायन्स कॉंग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनाला हजर राहायचे आणि शास्त्रज्ञांचे मनोबल वाढवायचे. त्यांच्यामुळेच इस्रोच्या माध्यमातून आपण आकाशात भराऱ्या मारतोय. अशा अनेक संस्थांच्या उपयोगितेवर आज नजर फिरवल्यास भारतात नेहरु युग का महत्वाचे होते हे कळते. आज नेहरुंवर टीका करणाऱ्यांनी हा विचार करावा की या संस्था नसत्या तर?

नेहरुंचे शिक्षण युरोपात झाल्याने त्यांच्यावर व्यक्तिगत स्वातंत्र्याचा मोठा पगडा होता. पंतप्रधान झाल्यावरही त्याच्यात बदल झाला नाही. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचे विचार ते लक्षपूर्वक ऐकायचे. 'मॉडर्न रिव्ह्यू' या कलकत्ता येथील मासिकाने एक लेख नेहरुंवर सडकून टीका केली होती. पण नेहरुंनी त्या लेखाचे कौतुक केले. व्यक्तीपेक्षा देश मोठा असतो असे ते म्हणायचे. अटल बिहारी वाजपेयी हे नेहरुंचे राजकीय आणि वैचारिक कट्टर विरोधक. एकदा वाजपेयींनी संसदेत नेहरुंच्या व्यक्तिमत्वात चर्चिल आणि चेंबर्लीन अशा दोन्ही व्यक्ती वास करतात अशी टीका केली. ती टीका कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांना जिव्हारी लागली होती. त्याच दिवशी विमानतळावर नेहरुंनी वाजपेयींची भेट घेतली आणि त्यांच्या भाषणाचे कौतुक केले. वाजपेयी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी हा किस्सा संसदेत सांगितला. ते म्हणाले की, "आजच्या काळात कोणावर तशा प्रकारची टीका करायचे धाडस होत नाही. तशी टीका कोणावर केलीच तर लगेच शत्रूत्व निर्माण होते, अबोला निर्माण होतो."

प्रसिद्ध कार्टूनिस्ट शंकर यांनीही अनेक वेळा नेहरुंवर त्यांच्या व्यंगचित्रातून टीका केली. पण नेहरुंनी त्यांना 'पदमश्री' आणि 'पदमभूषण' देऊन त्यांचा गौरव केला.

आयुष्याची नऊ वर्षे तुरुंगात नेहरुंचा जन्म एका सुखवस्तू कुटुंबात झाला होता. त्यामुळे आजच्या काळातील अनेकांना असे वाटते की नेहरुंचे जीवन मौजमजेत आणि अय्याशीत गेले. तशाच प्रकारची नेहरुंची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. कदाचित आजच्या कॉंग्रेस नेत्यांकडे बघून त्याकाळच्या नेहरुंना जज् केलं जातंय. पण नेहरुंनी त्यांच्या ऐन तारुण्यातील तब्बल नऊ वर्षे तुरुंगात घालवली हे सांगितल्यास कुणाचाही विश्वास बसणार नाही. त्यांना सर्वात कमी म्हणजे 12 दिवसांचा तुरुंगवास 1923 साली झाला तर सर्वात जास्त तुरुंगवास 1041 दिवसांचा झाला. 1942 सालच्या छोडो भारत आंदोलनाच्या वेळी नेहरुंना शेवटची अटक झाली. त्यावेळी त्यांना 1041 दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागला होता. 1945 साली त्यांची सुटका करण्यात आली.

शेतकऱ्यांनी शासनाला कर देऊ नये असे आवाहन केल्यानंतर त्यांना 1931 साली अटक करुन तुरुंगात टाकण्यात आले. त्यावेळी त्यांच्या मुलीला म्हणजे इंदिरा गांधींना तुरुंगातूनच पत्रे लिहली. जागतिक इतिहासावर आधारित या पत्रांचे पुढे 'ग्लिंम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री' या पुस्तकात रुपांतर झाले. शेवटच्या तुरुंगवासात म्हणजे 'छोडो भारत'च्या अटकेवेळी त्यांना अहमदनगरच्या तुरुंगात डांबण्यात आले होते. त्यावेळी नेहरुंनी त्यांचे जगप्रसिद्ध पुस्तक 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हे पुस्तक लिहले.

अलिप्ततावादाचे जनक भारताला स्वातंत्र्य मिळायच्या पूर्वीच नेहरुंनी अनेक देशांचे दौरे केले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रश्नांची जाण त्यांना होती. भारत स्वातंत्र्य झाला तो काळ म्हणजे शीतयुद्धाचा काळ. जग अमेरिका आणि रशिया अशा दोन गटांत विभागले होते. त्याचवेळी आशियातील आणि आफ्रिकेतील अनेक देश नव्याने स्वातंत्र्य झाले होते. अशा वेळी या तिसऱ्या जगाचे नेतृत्व नेहरुंनी केले आणि या दोन्ही देशांच्या वळचळणीला जाण्याचे नाकारले. या दोन्हीपैकी कोणत्याही गटात जाणे म्हणजे पुन्हा आपले स्वातंत्र्य गमावणे हे पक्के नेहरुंना समजले होते. म्हणून त्यांनी या नववसाहतवादाला नाकारले आणि स्वत:ची अशी विदेश नीती ठरवली. त्यांनी शांततामय सहजीवनाचा समावेश असलेल्या पंचशील धोरणांचा पुरस्कार केला.

तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आयसेन हवर यांनी नेहरुंना एक प्रश्न विचारला, "तुम्ही आमच्यासोबत आहात की आमच्या विरोधात?" त्यावर नेहरुंनी फक्त 'होय' असे उत्तर दिले. ज्यावेळी आम्ही तुमच्या मताशी सहमत असू त्यावेळी तुमच्या सोबत असू आणि ज्यावेळी आम्ही तुमच्या मताशी सहमत नसू त्यावेळी तुमच्या विरोधात असू. काय बरोबर आणि काय चूक ते आम्ही ठरवू असाच काहीसा त्यांच्या उत्तराचा अर्थ होता.

स्वप्नाळू आणि आदर्शवादामुळे नुकसान पंडित जवाहरलाल नेहरुंनी सर्वात वाईट अवस्थेत असलेल्या भारताचे नेतृत्व केले. त्यांच्या सतरा वर्षाच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत त्यांचे अनेक निर्णय चुकले असतील किंवा त्यांच्या विचारसरणीला विरोध असू शकतो. त्यांचे परराष्ट्र धोरण अगदीच आदर्शवादी होते. काही वेळा नेहरुंनी स्वत:ची शांततावादी प्रतिमा जपण्याच्या नादात देशाचे नुकसान केले. काश्मीर प्रश्नात हे ध्यानात येते. स्वप्नाळू वृत्तीमुळे चीनवर अनावश्यक विश्वास ठेवला आणि देशाला 1962 च्या युद्धाला सामोरं जावं लागलं. त्यात भारताचे न भरुन येणारे नुकसान झाले. वास्तववादाचा विचार न करता अनेकवेळा त्यांचा आदर्शवाद आणि मूल्ये देशहिताच्या आड आली. त्यांच्याकडून असलेल्या सर्वच अपेक्षा ते पूर्ण करु शकले नाहीत हेही खरे.

पण नेहरुंना एक माणूस म्हणून बघता, त्यांच्या चीन वा काश्मीर प्रश्नावरच्या चुका बाजूला ठेवून परीक्षण करता त्यांनी आजचा आधुनिक भारत घडवण्याच्या दृष्टीकोनातून पाया रचला हे नक्की. आताच्या काळात त्यावेळची परिस्थिती लक्षात न घेता त्यांचे मूल्यमापन करुन त्यांना थेट खलनायक ठरवण्याचा प्रकार अलिकडे मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय.

या चुका वा त्या परिस्थीतीतील काही निर्णय वगळता नेहरुंकडे पाहिल्यास नेहरुंची प्रतिमा आपल्या नजरेहून मोठी आहे हे नक्की. देश ऐन फुटीच्या उंबरठ्यावर असताना त्यांचे नेतृत्व लाभल्याने भारताचे बाल्कनायझेशन व्हायचा धोका टळला. नेहरुंनी कट्टरवाद्यांना भिक न घालता भारताची एकता आणि एकात्मता टिकवली. त्यांच्यावर हिंदू आणि मुस्लीम धर्मातील कट्टरवाद्यांनी चिखलफेक केली, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले तरीही नेहरुंनी त्याची कधीच पर्वा केली नाही आणि धर्मनिरपेक्षतेचे संरक्षण केले.

नेहरुंची प्रासंगिकता मोठी आहे. मग ती समर्थनार्थ असो वा विरोधात. आज नेहरुंचे विरोधक अशी ज्या सरदार वल्लभ भाई पटेलांची प्रतिमा निर्माण केली जात आहे त्या पटेलांनी 1949 साली म्हटलंय की, "मी आणि जवाहर स्वातंत्र्याच्या आंदोलनातून तयार झालेले नेते आहोत. आम्ही एकत्र काम केलंय आणि दोघेही महात्मा गांधींचे कट्टर अनुयायी आहोत. जवाहरमध्ये असे काही चुंबकीय आकर्षण आहे जे प्रत्येकाला आकर्षित करते. त्याने देशासाठी किती परिश्रम घेतले आहे हे माझ्या व्यतिरिक्त कोणालाच माहित नाही. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे यशस्वी नेतृत्व केले आहे." सरदार पटेलांच्या या वक्तव्याला कोणत्याही पुराव्याची गरज नाही.

स्वातंत्र्यापूर्वीही आणि नंतरही, नेहरुंच्या मूल्यांत काही बदल झाला नाही. त्यांनी देशात लोकशाही, उदारता, धर्मनिरपेक्षता, संविधानातील मूल्ये रुजवली आणि वाढवली. त्याचेच फळ आज आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रुपात चाखत आहोत. आजच्या सत्तेच्या महाभारतात नेहरुंना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय. पण सत्तर वर्षे मागे जाऊन पाहिल्यास नेहरु हे निर्विवाद नायक होते हे समजते. त्यांच्या प्रतिमेत करिश्मा होता, वादही होता. पण त्याच्या पुढे जाऊन नवा भारत निर्माण करण्याची तडफ सर्वात जास्त होती. त्यांची प्रतिमा 'लार्जर दॅन लाईफ' होती, एका स्वातंत्र्य आणि सार्वभौम राष्ट्राच्या प्रथम सेवकाची होती आणि आजही आहे. म्हणूनच त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या वैचारिक विरोधकांकडून त्यांचे अनुकरण करण्याचा अनेकदा प्रयत्न केला जातोय.

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Embed widget