Shardiya Navratri 2024 : आजपासून नवरात्रीला सुरुवात; जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त, पूजा, विधी आणि तिथी
Shardiya Navratri 2024 : हिंदू पंचांगानुसार, यावर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होते.
Shardiya Navratri 2024 : गणेशोत्सवानंतर बघता बघता नवरात्रीला सुरु होणार आहे. नवरात्रोत्सव (Navratri 2024) भारतात अगदी मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणारा सण आहे. या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. त्यानुसार, उद्या म्हणजेच 3 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे. यावेळी नेमकी कोणत्या शुभ मुहूर्तावर देवीची पूजा करावी? यासाठी पूजा, विधी आणि अचूक उपाय नेमके कोणते ते जाणून घेऊयात.
शारदीय नवरात्री 2024 कधी आहे? (Shardiya Navratri 2024 Date)
हिंदू पंचांगानुसार, यावर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होते. यंदा ही तिथी 2 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजून 18 मिनिटांनी सुरु झाली असून 4 ऑक्टोबरला पहाटे 2 वाजून 58 मिनिटांनी संपेल. उदयतिथीनुसार, शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबरपासून सुरु होईल.
घटस्थापना मुहूर्त (Ghatasthapana Muhurta)
नवरात्रीत कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त 3 ऑक्टोबरला म्हणजेच आज सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी सुरू झाला असून आणि तो 7 वाजून 22 मिनिटांपर्यंत असेल. घटस्थापनेसाठी अभिजीत मुहूर्त सकाळी 11 वाजून 46 मिनिटे ते दुपारी 12 वाजून 33 मिनिटांपर्यंत असेल.
घटस्थापना पूजा पद्धत (Ghatasthapana Puja Vidhi)
- शारदीय नवरात्रीच्या आधी घराची साफसफाई करा, त्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी लवकर उठून स्नान करुन स्वच्छ वस्त्र परिधान करा.
- मंदिर स्वच्छ करुन गंगाजल शिंपडून शुद्ध करा. उत्तर किंवा ईशान्य दिशेला कापड ठेवून त्यावर देवीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवा.
- तसेच कलश स्थापनेसाठी एक मातीचे भांडे घ्या, त्यानंतर त्यात धान्य घाला.
- याशिवाय तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी आणि गंगाजल टाकावे.
- कलशावर धागा बांधा. त्यावर कुंकवाने स्वस्तिक बनवा.
- तसेच कलशात अक्षता, सुपारी आणि नाणे ठेवा. नंतर कलशावर चुनरी बांधून नारळ ठेवा. विधीनुसार देवीची पूजा करावी. सुपारी, फळे आणि मिठाई अर्पण करा.
- दुर्गा सप्तशती पाठ करा. शेवटी आरती करून प्रसाद वाटा.
शारदीय नवरात्री 2024 तिथी (Navratri 2024 Dates)
दिवस पहिला - 3 ऑक्टोबर, गुरुवार - घटस्थापना, शैलपुत्री पूजा
दिवस दुसरा - 4 ऑक्टोबर, शुक्रवार - ब्रह्मचारिणी पूजा
दिवस तिसरा - 5 ऑक्टोबर, शनिवार - चंद्रघंटा पूजा
दिवस चौथा - 6 ऑक्टोबर, रविवार - विनायक चतुर्थी
दिवस पाचवा - 7 ऑक्टोबर सोमवार - कुष्मांडा पूजा
दिवस सहावा - 8 ऑक्टोबर मंगळवार- स्कंदमाता पूजा
दिवस सातवा - 9 ऑक्टोबर बुधवार- कात्यायनी पूजा
दिवस आठवा - 10 ऑक्टोबर, गुरुवार - कालरात्री पूजा
दिवस नववा - 11 ऑक्टोबर, शुक्रवार - दुर्गा अष्टमी, महागौरी पूजा शारदीय
दिवस दहावा - 12 ऑक्टोबर, शनिवार - नवमी हवन, दुर्गा विसर्जन, विजयादशमी, दसरा, शस्त्रपूजा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: