Raksha Bandhan 2025 : यंदा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त नेमका कधी? भद्राचं सावट असणार की नाही? वाचा A to Z माहिती
Raksha Bandhan 2025 : पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला रक्षाबंधन साजरी केली जाते. यंदा पौर्णिमा तिथी 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारपासून सुरु होईल.

Raksha Bandhan 2025 : हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे, रक्षाबंधन (Raksha Bandhan) या सणाला विशेष महत्त्व आहे. भावा-बहिणीच्या नात्यातील अतूट प्रेम दर्शवणारा हा सोहळा आहे. या दिवशी बहीण भावाच्या हाताला राखी बांधते. तसेच, भावाच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात. तर, भाऊ बहिणीच्या रक्षणासाठी वचन देतो आणि बहिणीला छानशी भेटवस्तू देतो. त्यानुसार, यंदा 9 ऑगस्ट 2025 च्या रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. मात्र, या काळात भद्र काळाचं सावट असणार आहे की नाही ते जाणून घेऊयात.
रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त 2025 (Raksha Bandhan Shubh Muhurta 2025)
पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला रक्षाबंधन साजरी केली जाते. यंदा पौर्णिमा तिथी 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजून 12 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजून 21 मिनिटांपर्यंत ही तिथी समाप्त होणार आहे. मात्र, उदय तिथीनुसार, 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरी होणार आहे.
भद्राचं सावट आहे की नाही?
शास्त्रानुसार, भद्र काळात रक्षाबंधन साजरा करणं शुभ मानलं जात नाही. त्यामुळे या काळात भावाला राखी बांधू नये. मात्र, यंदा रक्षाबंधन काळात भद्राचं सावट नसणार आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही .
राखी कधी काढावी?
मान्यतेनुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाला प्रेमाने बांधलेली राखी 24 तासांनंतर काढू शकता. तसेच, जन्माष्टमीच्या दिवशीही तुम्ही राखी काढू शकता. काही लोक रक्षासूत्र म्हणून जोपर्यंत राखी निघत नाही तोपर्यंत हातातून काढत नाहीत.
भद्राकाळात राखी का बांधू नये?
पौराणिक मान्यतेनुसार, भद्रा भगवान सूर्य आणि त्यांची पत्नी छाया यांची कन्या आहे. तसेच, शनीदेवाची बहीण आहे. मान्यतेनुसार, भद्रामध्ये राखी न बांधण्यामागे एक आख्यायिका आहे, त्यानुसार लंकेचा राजा रावणाला भद्रा काळात त्याच्या बहिणीने राखी बांधली होती. भद्राकाळामध्ये राखी बांधल्यामुळे रावणाचा नाश झाल्याचे सांगितले जाते. अशा स्थितीत, या श्रद्धेच्या आधारे जेव्हा जेव्हा भद्रा काळ लागतो , तेव्हा बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधत नाहीत. तो काळ लोटल्यानंतर राखी बांधता येते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















