Navdurga 2024 : धाडसी आणि पराक्रमी अशा Income Tax कमिशनर प्राजक्ता ठाकूर खटावकर यांची विशेष मुलाखत
Navdurga 2024 : आजची दुर्गा, आयकर विभागातील सह-आयुक्त, अर्थात जॉईंट कमिशनर इन्कम टॅक्स... प्राजक्ता ठाकूर खटावकर.
Navdurga 2024 : एका परीपूर्ण स्त्रीचं, पत्नीचं, गृहिणीचं वर्णन करताना... कार्येषु मंत्री असा एक उल्लेख आपल्या पुराणांमध्ये आहे. जिथे जिथे Administrationची आवश्यकता असते तिथे एक स्त्री ही उत्तम मंत्री असते... म्हणजे आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडणारी व्यक्ती! अर्थात... प्रत्येक आदर्ष गृहिणी उत्तम नियोजन करून, उपलब्ध संसाधनांचा सुयोग्य वापर करून एक संसार छानपणे चालवत असते. पण जेव्हा प्रशासनातील कुठल्याही महत्त्वाच्या विभागातील जबाबदारी तिच्यावर असते, तेव्हाही ती एक उत्तम प्रशासक म्हणून आपल्या कर्तृत्वाचा ठसा अगदी ठळकपणे उमटवते. अशीच आहे आजची दुर्गा, आयकर विभागातील सह-आयुक्त, अर्थात जॉईंट कमिशनर इन्कम टॅक्स... प्राजक्ता ठाकूर खटावकर... ज्या भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी... म्हणजे आय आर एस ऑफिसर आहेत.
प्राजक्ता यांचं बालपण त्यांच्या मूळ गावी कोकणातील कुडाळ येथे गेलं. लहानपणी अभ्यासासोबतच त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. सुरुवातीला बालकथा... त्यानंतर, काही कथा-कविता वगैरे साहित्य आणि नंतर... सर्व प्रकारचं वाचन, अशा प्रकारे त्यांचा वाचनातील व्यासंग वाढतच गेला. या वाचनामुळे त्यांची एक विचारशैली, एक असं व्यक्तिमत्व घडत गेलं. त्यातूनच साकारलेलं त्यांचं इन्कम टॅक्स कमिशनर हे प्रभावी व्यक्तिमत्व आज आपल्याला दिसतंय. पण आज हे ऐकून कित्येकांना आश्चर्य वाटेल की गायनाची अत्यंत आवड असलेल्या प्राजक्ता यांना सुरुवातीला... एक गायिका म्हणून करिअर करायचं होतं. त्यासाठी त्यांनी ज्येष्ठ गायिका किशोरीताई आमोणकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेण्याचा प्रयत्नही केला होता... परंतु, जेव्हा फक्त गाणं की करिअर यातून एक निवडण्याची वेळ त्यांच्यावर आली... तेव्हा त्यांनी आपल्या इच्छेला थोडी मुरड घातली आणि कुठलेतरी लोकापयोगी किंवा व्यवसायाभिमुख शिक्षण घ्यायला हवे, असा निर्णय घेऊन Instrumentation & Control शाखेतील इंजीनिअरींगची डिग्री त्यांनी घेतली. त्याचबरोबरीने त्यांनी UPSC चा अभ्यासही सुरू केला होता.
रेव्हेन्यू विभागात तहसीलदार असलेल्या त्यांच्या वडिलांची अशी खूप इच्छा होती की, त्यांच्या मुलाने किंवा मुलीने समाजातील लोकांना उपयोगी ठरेल अशा प्रकारच्या नोकरीत करिअर करावं! आणि... वडीलांच्याच मार्गदर्शनाने, प्राजक्ता यांनी एक इंडीयन रेव्हेन्यू सर्व्हीसेस ऑफिसर होऊन त्याचं ते स्वप्न पूर्ण केलं आणि त्याचा त्यांना सार्थ अभिमानही आहे. आज कुडाळसारख्या छोटया गावातील एका मुलीने... या महत्त्वाच्या पदापर्यंत घेतलेली ही गरूडझेप खरंच स्वप्नवत आहे.
प्राजक्ता त्यांच्या या यशाचं श्रेय... त्यांनी विदयार्थी असताना केलेल्या प्रचंड वाचनाला देतात आणि त्याचबरोबर संगीतालाही... कारण या पदावर सेवा बजावत असताना अनेक प्रकारचे ताणतणाव घेऊन वावरावं लागतं... त्यावेळी संगीतच एक रामबाण औषध म्हणून उपयोगात येतं... आता तर त्यांनी आपल्या संगीताचा अभ्यासही परत सुरू केला आहे, त्यांना त्यासाठी त्यांच्या डिपार्टमेन्ट कडून विशेष प्रोत्साहन आणि आवश्यक ते सहकार्य मिळत आहे!
प्राजक्ता यांच्या मते, कुठल्याही जबाबदारीच्या पदावर नोकरी करताना आपल्या जोडीदाराची निवड ही फारच विचारपूर्वकपणे करायला हवी... कारण पतीची एक समंजसपणे साथ आणि पूर्ण सहकार्य मिळाल्याशिवाय अशी नोकरी करणं शक्यच होत नाही! आज दोन मुलींची आई असूनही आपली इन्कम टॅक्स कमिशनर ही जबाबदारी पार पाडताना, त्यांना त्यांच्या पतीची आणि आईवडिलांची खूपच मोलाची मदत होते! आपल्यावरील सर्व जबाबदा-या अष्टावधानी राहून, प्रसंगी दहा हातांनी काम करून यशस्वीपणे पार पाडणा-या आधुनिक दुर्गेला आमचा मानाचा मुजरा!
पाहा व्हिडीओ :
हे ही वाचा :