(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Narak Chaturdashi : अकाली मृत्यूपासून मुक्ती मिळण्यासाठी करतात नरक चतुर्दशीची पूजा, शुभ मुहूर्त आणि महत्व जाणून घ्या
Narak Chaturdashi : नरक चतुर्दशीची पूजा अकाली मृत्यूपासून मुक्ती आणि आरोग्य रक्षणासाठी केली जाते.
Narak Chaturdashi : हिंदू पंचांगानुसार, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi) साजरी केली जाते. नरक चतुर्दशी दिवाळीच्या (Diwali 2022) एक दिवस आधी आणि धनत्रयोदशीच्या एक दिवसानंतर साजरी केली जाते. मात्र यावेळी नरक चतुर्दशी आणि दिवाळी एकाच दिवशी साजरी होणार आहे. याला छोटी दिवाळी, रूप चौदस, नरका चौदस, रूप चतुर्दशी किंवा नरका पूजा असेही म्हणतात. या दिवशी मृत्युदेवता, यमराज आणि श्रीकृष्ण यांची पूजा करण्याचा नियम आहे. या दिवशी संध्याकाळी दिवे लावले जातात, नरक चतुर्दशीची पूजा अकाली मृत्यूपासून मुक्ती आणि आरोग्य रक्षणासाठी केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून देव आणि ऋषींना त्याच्या दहशतीपासून मुक्त केले.
नरक चतुर्दशी शुभ मुहूर्त
पंचांगानुसार, कार्तिक कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 06.03 पासून सुरू होत आहे. चतुर्दशी तिथी 24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5:27 वाजता समाप्त होईल. तर नरक चतुर्दशी 24 ऑक्टोबर रोजी उदय तिथीनुसार साजरी केली जाईल.
नरक चतुर्दशी 2022 ची पूजा पद्धत
नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत.
नरक चतुर्दशीच्या दिवशी यमराज, श्रीकृष्ण, काली माता, भगवान शिव, हनुमानजी आणि विष्णूजींच्या वामन स्वरूपाची विशेष पूजा केली जाते.
या सर्व देवतांच्या मूर्ती घराच्या ईशान्य कोपऱ्यात स्थापित करा आणि त्यांची विधिवत पूजा करा.
देवतांच्या समोर धूप दिवा लावा, हळदी-कुंकु लावा आणि मंत्रांचा उच्चार करा.
अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते
नरक चतुर्दशीच्या दिवशी यमदेवाची पूजा केल्याने अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते, असे मानले जाते. तसेच सर्व पापांचा नाश होतो, त्यामुळे संध्याकाळी यमदेवाची पूजा करा आणि घराच्या दाराच्या दोन्ही बाजूला दिवा अवश्य लावा.
संबंधित बातम्या