Maha kumbh 2025: प्रयागराज नंतर पुढील कुंभमेळा कधी आणि कुठे होणार? तुमच्या विविध प्रश्नांची उत्तर, संपूर्ण माहिती जाणून घ्या..
Maha kumbh 2025: आज महाकुंभाचा भव्य समारोप होत आहे, त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न आहे की, पुढचा कुंभमेळा कधी आणि कुठे होणार आहे? जाणून घ्या..

Maha kumbh 2025: हिंदू धर्मात कुंभमेळ्याला मोठं महत्त्व आहे. दर 12 वर्षांनी महाकुंभमेळा आयोजित केला जातो. महाकुंभ हा सर्वात मोठा आणि प्रमुख धार्मिक विधी मानला जातो. कुंभमेळ्याला लाखो आणि कोट्यवधी भाविक उपस्थिती दर्शवितात. धार्मिक मान्यतेनुसार, जो कुंभात स्नान करतो त्याची सर्व पापं नष्ट होतात. एवढंच नाही तर त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. महाकुंभ दरम्यान विशेष पूजा, यज्ञ आणि इतर धार्मिक विधी केले जातात. 13 जानेवारी 2025 पासून प्रयागराज येथे पौष पौर्णिमेपासून महाकुंभाला आरंभ झाला. आज म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी महाकुंभाचा समारोप होत आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न आहे की, पुढचा कुंभमेळा कधी आणि कुठे होणार आहे? जाणून घ्या..
प्रयागराज नंतर पुढील कुंभमेळा कधी आणि कुठे होणार?
कुंभ आयोजन चक्र हे 12 वर्षांचे आहे. या 12 वर्षांत ग्रहांच्या स्थितीनुसार त्यांची स्थितीही बदलते. यंदाचा कुंभमेळा हा गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर प्रयागराज येथे आयोजित करण्यात आला. याच सोबत हरिद्वारमध्येही गंगा नदीवर कुंभ आयोजित केला जातो, तर उज्जैनमध्ये क्षिप्रा नदीजवळ कुंभ आयोजित केला जातो. नाशिक-त्र्यंबकेश्वर गोदावरी नदी वाहते, तिच्या काठावर भव्य कुंभमेळा भरतो. पौराणिक मान्यतेनुसार, देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथनाच्या वेळी अमृत कलशाचे काही थेंब नाशिकमध्ये पडले, त्यामुळे येथे कुंभाचे आयोजन केले जाते. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे दर 12 वर्षांनी एकदा कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. शेवटचा नाशिक कुंभमेळा 2015 मध्ये झाला होता, त्यामुळे पुढचा कुंभमेळा 2033 मध्ये होणार आहे.
नाशिकच्या कुंभमेळ्याला विशेष महत्त्व
धर्मग्रंथात नाशिकच्या कुंभमेळ्याला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले आहे. त्र्यंबकेश्वर हे भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे, ज्याला दक्षिणेची गंगा म्हणतात. पुढील नाशिक कुंभ मेळा 2033 मध्ये, तर अर्ध कुंभ 2027 मध्ये होणार आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वरला महाकुंभ कधी होणार?
ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा गुरु (गुरू) सिंह राशीत प्रवेश करतो तेव्हा ही महाकुंभाचं आयोजन केले जातं आणि दर 12 वर्षातून एकदा होते. हिंदू दिनदर्शिकेनुसार, श्रावण आणि भाद्रपद महिन्यांच्या (जुलै ते सप्टेंबर) दरम्यान आयोजित केले जाते. यामध्ये तीन प्रमुख शाही स्नान असतील, पहिले शाही स्नान गुरु ग्रह सिंह राशीत प्रवेश केल्यावर होईल, दुसरे शाही स्नान प्रमुख अमावस्या किंवा पौर्णिमा तिथीला होईल आणि तिसरे शाही स्नान विशेष योगाने होते. नाशिकपासून 38 किलोमीटर अंतरावर असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे शनिवार, 17 जुलै 2027 पासून कुंभमेळा सुरू होणार असून, तो 17 ऑगस्ट 2027 पर्यंत चालणार आहे.
हेही वाचा>>>
Kedarnath: शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याची घोषणा, 'या' मुहूर्तावर चारधाम यात्रा सुरू होणार
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )




















