Janmashtami 2025: जन्माष्टमीला पूजा करण्याचा 'हा' सर्वात मोठा शुभ मुहूर्त! तिथी, शुभ काळ, उपवासाची वेळ, A टू Z माहिती वाचा..
Janmashtami 2025: वैदिक पंचांगानुसार, या वर्षी जन्माष्टमी 16 ऑगस्ट 2025, शनिवारी साजरी केली जाईल. यंदा पूजेचा मुहूर्त, उपवास सोडण्याची वेळ, सर्वकाही जाणून घ्या..

Janmashtami 2025: दरवर्षी श्रावण महिन्यात जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हिंदू धर्मात कृष्ण जन्माष्टमी हा प्रमुख सणांपैकी एक सण आहे, जो देशभर मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. याचे कारण म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा जन्म कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला झाला होता. या वर्षी जन्माष्टमी 16 ऑगस्ट 2025, शनिवारी साजरी केली जाईल. जन्माष्टमीचा सण दोन दिवस साजरा करण्याची परंपरा आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, पहिल्या दिवशी साधू-संन्यासी, स्मार्त पंथ जन्माष्टमी साजरा करतात, तर दुसऱ्या दिवशी वैष्णव पंथ आणि ब्रिजवासी हा सण साजरा करतात. यंदा जन्माष्टमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि उपवासाची वेळ काय असेल? सर्वकाही जाणून घेऊया...
अष्टमी तिथी कधीपासून सुरू होईल?
हिंदू दिनदर्शिकेनुसार, अष्टमी तिथी 15 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11:49 वाजता सुरू होईल. ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 9:34 पर्यंत राहील. या उदयतिथीचा विचार करता, 16 ऑगस्ट 2025 रोजी जन्माष्टमीचे व्रत केले जाईल.
जन्माष्टमीचे हे शुभ मुहूर्त..
पंचांगानुसार, जन्माष्टमीला पूजेसाठी अनेक शुभ मुहूर्त आहेत. हे दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी पडतात. यापैकी पहिला शुभ मुहूर्त ब्रह्म मुहूर्तात पहाटे 04:24 ते पहाटे 05:07 पर्यंत असेल. दुसरा अभिजित मुहूर्त सकाळी 11:59 ते दुपारी 12:51 पर्यंत असेल. विजय मुहूर्त दुपारी 02:37 ते 03:39 पर्यंत असेल. गोधूलि मुहूर्त संध्याकाळी 06:59 ते 07:21 पर्यंत असेल.
जन्माष्टमीच्या पूजेसाठी हा सर्वात शुभ काळ
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रातील अष्टमी तिथीच्या मध्यरात्री झाला होता. या परंपरेत, बाल गोपाळांची पूजा केली जाते. निशिता कालात, त्यांना स्नान घालून अन्नदान केले जाते. यावेळी, पूजेचा हा शुभ काळ फक्त 43 मिनिटांचा असेल. यामध्ये, शुभ काळ 17 ऑगस्ट रोजी, 16 तारखेच्या दुसऱ्या दिवशी, रात्री 12:04 ते 12:47 पर्यंत असेल.
जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा कशी करावी?
स्नान - रात्री 12 वाजता, श्रीकृष्ण किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला पंचामृताने स्नान करा. जर तुमच्याकडे शंख असेल तर तुम्ही त्याद्वारे देखील स्नान करू शकता.
शृंगार - स्नान केल्यानंतर, श्रीकृष्णाला नवीन कपडे घाला, त्यांना चंदनाचा टिळक, सुगंधी द्रव्य, मोरपंख, बासरी आणि तुळशीची पाने इत्यादींनी सजवा.
पाळणा - भगवानांना पाळण्यात बसवा आणि एखादा पाळणागीत, जय कन्हैया लाल की" म्हणत तो झुलावा.
नैवेद्य - जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाला लोणी-साखर, पंजीरी, फळे, मिठाई आणि तुळशीची पाने अर्पण करा.
आरती- भगवान श्रीकृष्णाची आरती करा आणि "हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे" या मंत्राचा जप करा.
उपवास - जर तुम्ही उपवास केला असेल, तर पूजा केल्यानंतर प्रसाद घेऊन उपवास सोडा.
उपवास सोडण्याची वेळ
काही भाविक भगवान श्रीकृष्णाची पूजा करून जन्माष्टमीचा उपवास सोडतात. काही लोक सूर्योदयानंतर उपवास सोडतात. 17 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12:47 नंतर उपवास सोडला जाईल. दुसऱ्या दिवशी, 17 ऑगस्ट रोजी, सूर्योदयानंतर पहाटे 05:51 वाजता उपवास सोडता येतो.
हेही वाचा :
Janmashatami 2025: जन्माष्टमीला 'या' रंगाचे कपडे चुकूनही घालू नका! भाग्य होईल नाराज, तुमच्या राशीनुसार 'हे' रंग निवडा, वर्षभर नशीबाची साथ
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















