Garud Puran: प्रत्येक घरात मुली का जन्म घेत नाहीत? श्रीकृष्णांनी महाभारतात काय म्हटलंय? जाणून घ्या
Garud Puran: असे कोणते कर्म आहे, ज्यामुळे मातापित्याला कन्यारत्न मिळते? प्रत्येक घरात मुली का जन्माला येत नाहीत? गरुडपुराणानुसार जाणून घेऊया..
Garud Puran: आजकाल आपण महिलांवरील अत्याचार वाढत असल्याच्या धक्कादायक बातम्या ऐकतो, पाहतो...ज्यामुळे महिलांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. आजही महिलांना घरापासून बाहेरपर्यंत प्रवास करणे असुरक्षित वाटते. इतकेच नाही तर काही लोक असेही राक्षसी वृत्तीचे आहेत, जे जन्मापूर्वीच मुलींची आईच्या उदरात हत्या करतात. महाभारतात सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने भ्रूणहत्या हे सर्वात मोठे पाप मानले आहे. पण तुम्हाला माहित आहे का? प्रत्येक घरात मुली का जन्माला येत नाहीत? याबद्दल श्रीकृष्ण काय सांगतात? गरुड पुराणात काय म्हटलंय? सविस्तर जाणून घेऊया.
कन्यारत्न कसे लाभते? भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं..
हे देखील सत्य आहे की काही लोक अजूनही मुलींना ओझे मानतात. हिंदू धर्मात प्राचीन काळापासून मुलींना समान अधिकार दिलेले आहेत. पण ज्ञानाअभावी काही लोक मुलींना ओझे म्हणून पाहतात. पण त्यांना कदाचित माहीत नसेल, हिंदू धर्मात मुलींना लक्ष्मीचे रूप मानले जाते. आजही हिंदू लोक नवरात्रीमध्ये मुलींची पूजा करतात, कन्यारत्न उगाचच मिळत नाही. याचे कारण भगवान श्रीकृष्णाने सविस्तरपणे सांगितलंय.. जाणून घ्या..
गरुड पुराणात काय म्हटलंय?
गरुड पुराणात एक कथा वर्णन केलेली आहे. या कथेत श्रीकृष्ण सांगतात की, कोणत्या घरात मुलींचा जन्म होतो. कथेनुसार, एके दिवशी अर्जुन आणि श्रीकृष्ण बसले होते. दोघेही जन्म-मृत्यूबद्दल बोलत होते. त्याचवेळी अर्जुनने श्रीकृष्णाला विचारले की, देवा.. कोणत्या कर्मामुळे मातापित्याला कन्यारत्न मिळते? म्हणजेच देव मुलींच्या जन्मासाठी घरांची निवड कशी करतो? तेव्हा श्रीकृष्ण हसत हसत म्हणतात, पार्थ, आज अचानक तुझ्या मनात हा प्रश्न कसा काय आला? अर्जुन म्हणतो नारायण!, मी विचार करत होतो की सर्व मुली लक्ष्मी असतात आणि देवी लक्ष्मी प्रत्येकाच्या घरी येत नाही. म्हणूनच मी तुम्हाला हा प्रश्न विचारला आहे. त्यावर श्रीकृष्ण म्हणतात..
कोणत्या घरात मुलींचा जन्म होतो? श्रीकृष्ण म्हणाले..
श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना! कुणाच्या घरी मुलगा जन्माला आला तर ते त्याचे भाग्यच असते, पण कुणाच्या घरी मुलगी जन्माला आली तर ती त्याच्यासाठी सौभाग्याची गोष्ट असते. मुलं नशिबाने मिळतात तर मुली सौभाग्यानेच मिळतात. ज्या स्त्री-पुरुषांनी आपल्या पूर्वीच्या जन्मात चांगली कर्मे केली, त्यांनाच मुलीचे पालक बनण्याचा बहुमान मिळतो. श्रीकृष्ण पुढे म्हणतात, देव मुलींच्या जन्मासाठी अशीच घरे निवडतो, जे मुलींचा भार उचलू शकतील. देव जाणतो, काही लोक धनी असूनही जे मुलींचा भार उचलू शकत नाहीत. तर काही लोक असे आहेत जे गरीब असूनही आपल्या मुलींना मोठ्या प्रेमाने वाढवू शकतात. मुलींसाठी चांगले पालक कोण असू शकतात हे विश्वाच्या निर्मात्याला आधीच माहित आहे.
मुलींशिवाय सृष्टी अपूर्ण!
श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे म्हणतात, कन्याच हे विश्व चालवतात. ज्या दिवशी या जगात मुलींचा जन्म थांबेल, त्या दिवशी हे जग थांबेल. मग काही दिवसातच हे विश्व नष्ट होईल. मुलीच आपल्या आईवडिलांना मुली म्हणून सर्वात जास्त प्रेम देतात. मग लग्नानंतर ती सासरी गेल्यावर तिथं सून आणि बायको म्हणून तिचं प्रेम वाटून घेते. त्यानंतर ती आई झाल्यावर सर्वस्व आपल्या मुलाला देते. मुलगा एकच कुळ चालवतो, पण मुली दोन कुळांचा गौरव करतात.
स्त्रीच्या योनीत का जन्म घेतो?
गरुड पुराणात सांगितले आहे की, मृत्यूनंतर आत्म्याला त्याच्या कर्मानुसार दुसरा जन्म मिळतो. जे लोक मृत्यूच्या वेळीही स्त्रियांचा विचार करत असतात त्यांचा पुढचा जन्म स्त्री योनीत होतो. एवढेच नाही तर एखाद्या पुरुषाने आपल्या मानवी जीवनात स्त्रियांचा छळ केला किंवा त्रास दिला तर तो पुढच्या जन्मातही स्त्री म्हणून जन्माला येतो.
हेही वाचा>>>
Garud Puran: मृत्यूनंतर 13 दिवस आत्मा कुटुंबात का भटकत असतो? आत्मा यावेळी काय विचार करतो? गरुड पुराणात म्हटलंय..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )