(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dussehra 2024 : विजयादशमीचा शुभ मुहूर्त नेमका कधी? वाचा पूजा पद्धत आणि या दिनाचं महत्त्व
Dussehra 2024 : दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतिक म्हटला जातो.
Dussehra 2024 : शारदीय नवरात्रीचे (Shardiya Navratri 2024) नऊ दिवस पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच महानवमीच्या दुसऱ्या दिवशी दसरा म्हणजेच विजयादशमीचा (Vijayadashmi) दिवस असतो. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथीला दसरा (Dussehra 2024) साजरा केला जातो. हिंदू धर्मात या दिवसाला फार महत्त्व आहे. या दिवशी भगवान रामाने रावणावर विजय मिळवला म्हणून या दिवशी रामाची पूजा केली जाते. दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतिक म्हटला जातो. त्यानुसार, यंदा 12 ऑक्टोबर रोजी दसरा साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने दसऱ्याचा शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत जाणून घेऊयात.
दसरा शुभ मुहूर्त (Dussehra shubh Muhurta 2024) :
हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यातील शुक्ल दशमी तिथी 12 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजून 58 मिनिटांपासून सुरु होईल आणि 13 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजून 8 मिनिटांपर्यंत असणार आहे. दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतिक मानले जाते.
दसऱ्याचे महत्त्व (Importance Of Dussehra 2024)
दसरा या शब्दाला दशहरा असे देखील म्हणतात. तसेच, विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा, दसरा तसेच विजयादशमी असेही म्हणतात. या दिवशी प्रभू श्री रामाने लंकेचा राजा रावणाचा वध करुन विजय मिळवला होता. हा सण हिंदू सणांमध्ये प्रामुख्याचा मानला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणारा दसरा. पौराणिक कथेनुसार या दिवशी दुर्गा देवीने देवी चंडीकेचे रुप धारण करुन महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतिक म्हटला जातो. अश्विन शुक्ल पक्ष दशमीच्या दिवशी प्रभू रामाने रावणाचा वध करुन सीतेला सोडवले होते. तेव्हापासून दसरा साजरा करण्याची पद्धत आहे. तसेच या दिवशी रावणासह कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्याचेही दहन केले जाते.
दसऱ्याच्या दिवशी जुळून आला शुभ संयोग...
यंदा दसऱ्याचा शुभ मुहूर्त हा 12 ऑक्टोबरला असणार आहे. या दिवशी रवि योगासह सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. या योगात कोणतेही काम केल्यास ते यशस्वी होतील. दसऱ्याला रवि योग दिवसभर असल्यामुळे सर्व प्रकारचे दोष दूर होतील. तसेच सकाळी 6 वाजून 20 मिनिटांपासून ते रात्री 9 वाजून 8 मिनिटांपर्यंत सर्वार्थ सिद्धी योग असेल. दसऱ्याला शस्त्रपूजन करण्याचा शुभ मुहूर्त हा दुपारी 2 वाजून 3 मिनिटांपासून ते 2 वाजून 49 मिनिटांपर्यंत असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :