(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chanakya Niti : पक्ष्यांसारखी उंच भरारी घ्या; बगळा, कावळा, कोंबड्याकडून शिका 'या' महत्त्वाच्या गोष्टी, चाणक्य सांगतात...
Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांचं असं म्हणणं आहे की, जर एखाद्या व्यक्तीला कुठूनही आणि कोणाकडूनही चांगले गुण मिळत असतील तर ते लगेच आत्मसात करावेत. मग तो मनुष्य असो वा पशु-पक्षी.
Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महान आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. ते भारतीय राजकारण आणि नैतिकतेसाठी ओळखले जातात. प्रत्येक समस्येवर उपाय शोधण्याची त्यांची हातोटी होती. मानवी जीवनाच्या कल्याणासाठी त्यांनी चाणक्य नीती शास्त्राचा शोध लावला. आजवर आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी जीवनाचा मार्ग सुकर करण्यासाठी अनेक मार्ग सांगितले आहेत.
चाणक्य यांनी सांगितलं आहे की, जर एखाद्या व्यक्तीला आपल्या कुटुंबाला वैभव प्राप्त करून देण्याची इच्छा असेल तर तो ती पूर्ण करू शकतो. खरंतर, आपल्या कुटुंबाचं नाव प्रसिद्ध व्हावं अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. यासाठी आचार्य चाणक्यांच्या निती शास्त्रात सांगितलेल्या काही चांगल्या सवयींचा अवलंब करावा लागेल. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
आचार्य चाणक्य यांचं असं म्हणणं आहे की, जर एखाद्या व्यक्तीला कुठूनही आणि कोणाकडूनही चांगले गुण मिळत असतील तर ते लगेच आत्मसात करावेत. मग तो मनुष्य असो वा पशु-पक्षी. चाणक्य यांनी आपल्या लेखात अशाच काही पक्ष्यांच्या गुणांबद्दल सांगितलं आहे.
बगळा शिकवतो संयम - आचार्य चाणक्य म्हणतात की, व्यक्तीला बगळ्याप्रमाणे संयम ठेवणं गरजेचं आहे. बगळा ज्याप्रमाणे आपल्या इंद्रियांचा वापर करुन परिस्थितीचा अंदाज घेतो, संयम ठेवतो. त्याप्रमाणे मनुष्याने सुद्धा आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
कोकिळेकडून शिका मंजुळ वाणी - कोकिळेचा रंग जरी काळा असला तरी आपल्या मंजुळ वाणीने ती सर्वांचं मन जिंकून घेते. त्याचप्रमाणे, मनुष्याने देखील विनम्रतेने लोकांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करावा. जर तुम्ही खूप सुंदर असाल पण तुमची वाणीच जर चांगली नसेल तर तुमच्या सुंदरतेचा काही उपयोग नाही.
कावळ्याकडून शिका ही गोष्ट - कावळ्याप्रमाणेच मनुष्याने देखील वेळोवेळी संघर्षाचा सामना कसा करावा हे शिकलं पाहिजे. तसेच, कोणावरही विश्वास न ठेवता नेहमीच सावधानतेने निर्णय घ्यावा.
कोंबडा ही गोष्ट शिकवतो - आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, कोंबडा ब्रह्ममुहूर्तावर उठतो. तो कधीही संघर्षाला घाबरत नाही.मिळालेल्या अन्नात सर्वांचा विचार करतो.त्याप्रमाणे मनुष्यानेही या गोष्टींचं आचरण करावं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :