Untimely rain : मराठवाडा विदर्भासह राज्यातील काही भागात अवकाळीचा फटका, बळीराजा चिंतेत, अनेक ठिकाणी विजपुरवठा खंडीत
महाराष्ट्रातील वातावरणात बदल झाला आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहे.
Untimely rain : सध्या राज्यातील वातावरणात बदल झाला आहे. गेल्या काही दिवसात तापमानात चांगलीच वाढ झाली होती. मात्र, कालपासून राज्यातील वातावरण बदललं असून अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला आहे. दरम्यान, रात्री बुलढाणा शहर आणि परिसरात जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. सकाळीही पाऊस कमी अधिक प्रमाणात सुरुच आहे. या अवकाळी पाऊस आणि वाऱ्यामुळे संपूर्ण बुलडाणा शहर 10 तासापासून अंधारात आहे. शहरातील वीज पुरवठा खंडित केला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
शेतकऱ्यांची चिंता वाढली
दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, बुलडाणा जिल्ह्यात कालपासून अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. तर बुलढाणा शहर व परिसरातील मोताळा, देऊळघाट, सागवान या गावात रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु आहे. रात्री अचानक जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. ती सकाळपर्यंत कमी अधिक प्रमाणात सुरु आहे. बुलडाणा शहरातील वीज पुरवठा खंडित झाल्यानं संपूर्ण बुलडाणा शहर अंधारात आहे. गेल्या 10 तासापासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने रुग्णालये व रुग्णांचे हाल होत आहेत. तर या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. कांदा, हरभरा या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
नाशिकलाही अवकाळीनं झोडपलं
ऐन उन्हाळ्यात नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांना आज पहाटे विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने झोडपले. या पावसामुळे बळीराजासमोर मोठं संकट उभे राहिले आहे. द्राक्षांसह गहू आणि कांदा पिकाला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडीत झाला आहे. निफाड तालुक्यातील चांदोरी भागातही रात्री गारपीट झाली.
औरंगाबादमध्ये पावसाला सुरुवात
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, सोयगाव, सिल्लोड या तीन तालुक्यात सकाळपासूनच हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी पाऊस जोरदार बरसत आहे.
जळगावात गहू आणि मका पिकांचं नुकसान
जळगाव जिल्ह्यात परवा रात्रीपासून अनेक भागात कमी अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अमळनेर तालुक्यात पाटोदा शिवारात पावसासह वादळही झाल्याने या भागातील गहू आणि मका पिकांचं मोठ नुकसान झाले आहे. अगोदरच शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत आहेत, अशातच, नैसर्गिक आपत्तीमुळे हाता तोंडाशी आलेलं पीक जमीनदोस्त झाल्याने बळीराजा संकटात सापडलाय. दरम्यान, शासनाने त्वरित पंचनामे करुन मदत द्यावी, अशी अपेक्षा आता शेतकरी वर्गातून केली जात आहे. पालघर जिल्ह्यातील काही परिसरात देखील पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील काही भागात पाऊस झाला आहे.
दरम्यान, भर उन्हाळ्यात सुरु असलेल्या या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची हरभरा, गहू याची काढणी देखील सुरु आहे. अशातच अवकाळी पाऊस येत असल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच द्राक्ष पिकाला देखील फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.