(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tomato prices : पावसामुळं टोमॅटोची आवक घटली, किंमतीत 50 टक्क्यांची वाढ
टोमॅटोच्या दरत वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. बाजारपेठेत टोमॅटोची आवक कमी झाली आहे, परिणामी दरांमध्ये वाढ होत आहे.
Tomato prices : गेल्या काही दिवसात टोमॅटोच्या दरात (Tomato prices) घट झाली होती. मात्र, आता पुन्हा टोमॅटोच्या दरत वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसानं झालं आहे. याचा फटका टोमॅटो उत्पादकांना देखील बसला आहे. पावसामुळं टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळं बाजारपेठेत टोमॅटोची आवक कमी झाल्याचे दिसत आहे. परिणामी दरांमध्ये वाढ झाली आहे. याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे.
किरकोळ बाजारात टोमॅटोच्या किमंती 40 रुपयांवरुन 60 रुपये प्रति किलोवर
सध्या टोमॅटोच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. शिमला, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे टोमॅटोच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. नुकसान झाल्यानं बाजारपेठेत टोमॅटोची आवक कमी झाली आहे. त्यामुळं मुख्य भाजीपाला असलेल्या टोमॅटोच्या दरात ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात 40 रुपये प्रति किलोच्या आसपास असलेल्या किंमती अचानक 60 रुपये प्रति किलोवर पोहोचल्या आहेत. पावसाने पिकाचे नुकसान झाल्याने दिल्लीतील आझादपूर बाजर समितीत टोमॅटोचा पुरवठा कमी झाला आहे.
किलोमागे टोमॅटोच्या दरात 20 रुपये ते 28 रुपयांची वाढ
घाऊक बाजार टोमॅटोच्या दरांचा विचार केला तर किलोमागे 20 रुपये ते 28 रुपयांची वाढ झाली आहे. आता बाजारात नवीन पीक येईपर्यंत काही काळ भाव स्थिर राहतील अशी माहिती टोमॅटो ट्रेडर्स असोसिएशन आझादपूरचे अध्यक्ष अशोक कौशिक यांनी दिली. आझादपूर बाजार समिती ही आशियातील सर्वात मोठी आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारताने 20 दशलक्ष मेट्रिक टन टोमॅटोचे उत्पादन केले होते.
पावसाचा टोमॅटो उत्पादनावर परिणाम
टोमॅटोचे भाव कधी खाली येतील हे सांगणे कठीण असल्याचे मत भारतीय भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे म्हणाले. शेतकरी नवीन टोमॅटोची लागवड करत आहेत. पण पाऊस पडल्यास त्याचा पुन्हा भावावर परिणाम होण्याची शक्यता आहे. शिवाय, टोमॅटोचे उत्पादनही कमी होईल असेही श्रीराम गाढवे म्हणाले. देशातील टोमॅटो उत्पादक प्रदेशात मुसळधार पावसामुळे टोमॅटोवर परिणाम होत आहे. किरकोळ बाजारात अद्याप भाव उतरले नसले तरी शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही. संततधार पाऊस आणि ओलावा यामुळे त्यांच्या उत्पन्नाचेही नुकसान झाले आहे.
महत्वाच्या बातम्या: