Vegetables Price : भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ, ग्राहकांना झळ तर शेतकऱ्यांना फायदा
वाढत्या महागाईत भाज्यांच्या दरानं सर्वसामान्यांना झटका दिला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर भाज्यांच्या दरात चांगलीच दरवाढ झाली आहे.
Vegetables Price News : सध्या बाजारात भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. वाढत्या महागाईत भाज्यांच्या दरानं सर्वसामान्यांना झटका दिला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर भाज्यांच्या दरात चांगलीच दरवाढ झाली आहे. राज्यात विविध बाजारपेठेतील भाजी मंडईत दर वाढल्याची स्थिती आहे. याचा राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होतोय. मात्र, ग्राहकांच्या खिशाला झळ बसत असल्याचं चित्र आहे. बीन्स, शेवगा, दोडके आणि कारलच्या दराने शंभरी पार केली आहे. तर टोमॅटोच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडं कोलकताच्या बाजारपेठेत सुद्धा भाजीपाल्यांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्याठिकाणी टोमॅटो आणि लिंबाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत दरात दुपटीनं वाढ
कोलकता बाजारपेठेत टोमॅटो आणि लिंबाच्या दरात वाढ झाली आहे. त्यांचे दर 50 रुपयांच्या पुढे गेले आहेत. कोलकातामध्ये वातावरण उष्ण आहे, त्यामुळं भाज्यांच्या भाव गगनाला भिडले आहेत. भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, उष्णतेमुळे भाजीपाला महाग झाला असून, त्यामुळं लोकही खरेदी कमी करत आहेत. त्यांना नुकसान सहन करावं लागत आहे. सरकारी आकडेवारीवर नजर टाकली तर, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जूनमध्ये बहुतांश भाज्यांचे भाव दुपटीने वाढले आहेत. कोलकातामधील किरकोळ आणि मॉलमधील प्रमुख भाज्यांची दर पाहुयात...
कोलकता बाजारपेठेतील भाजीपाल्यांचे दर
कोलकताच्या बाजारपेठेत किरकोळ बाजारात बटाटा प्रतिकिलो 37 ते 41 रुपयांनी विकला जात आहे. तर मॉलमध्ये हा बटाटा 38 ते 53 रुपये किलोनं विकला जात आहे. टोमॅटोचा किरकोळ बाजारात दर हा 62 ते 69 रुपये किलो असून मॉलमध्ये 65 ते 89 रुपयांचा दर मिळतोय. किरकोळ बाजारात कांदा 22ते 24 रुपये दरानं विकला जातोय, तर मॉलमध्ये 23 ते 31 रुपये दरानं कांद्याची विक्री केली जातेय. कोबीचा विचार केला तर किरकोळ बाजारात 30 ते 33 रुपये तर मॉलमध्ये 31 ते 43 रुपये किलोनं विक्री होत आहे. शिमला मिरची 41 ते 46 तर मॉलमध्ये 43 ते 60 रुपयांनी विक्री केली जात आहे. लिंबाचा विचार केला तर किरकोळ बाजारात 67 ते 74 रुपयांनी विक्री होत आहे. तर मॉलमध्ये 70 ते 96 रुपयांमनी विक्री केली जात आहे.
उष्णता असल्यानं त्याचा परिणाम भाज्यांवर सुद्धा होतो. ऊन जास्त पडल्यानं शेतातील भाजीपाला खराब होतो. त्यामुळे उत्पन्न कमी झाल्याने भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक कमी होते. आवक कमी झाल्याने भाज्यांच्या दरात वाढ होते. त्यामुळे पावसाळा सुरु झाल्यानंतर या दरात घसरण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे. मात्र, संपूर्ण महाराष्ट्रात अद्याप पावसाला सुरुवात झाली नाही.
महत्वाच्या बातम्या: