सांगलीतील माडग्याळच्या मेंढीची किंमत ऐकून व्हाल थक्क, विक्रीनंतर शेतकऱ्याकडून भव्य मिरवणूक
जत तालुक्यातील माडग्याळ येथील शेळ्या आणि मेंढ्यांच्या बाजारात सहा मेंढ्यांची तब्बल 14 लाख रुपयांना विक्री झाली आहे. यातील एका मेंढीला सव्वा दोन लाखांहून अधिक किंमत मिळाली आहे.
सांगली : घोडा, बैल, म्हैस यांची लाखो रूपये किंमत तुम्ही ऐकली असेल. पण एखाद्या मेंढीची लाखो रूपये किंमत आजपर्यंत ऐकली नसेल. परंतु, जत तालुक्यातील माडग्याळ येथील शेळ्या आणि मेंढ्यांच्या बाजारात सहा मेंढ्यांची तब्बल 14 लाख रुपयांना विक्री झाली आहे. यातील एका मेंढीला सव्वा दोन लाखांहून अधिक किंमत मिळाली आहे. या उच्चांकी दरामुळे शेळ्या-मेंढ्यासाठी प्रसिद्ध असणारा जत तालुक्यातील माडग्याळ मधील बाजार पुन्हा चर्चेत आलाय.
जत तालुक्यातील माडग्याळ येथील मय्याप्पा चौगुले या शेतकऱ्याने आपल्या सहा मेंढ्या विक्रीसाठी बाजारात आणल्या होत्या. या मेंढ्या पाहताच खरेदीदारांनी मेंढ्यांभोवती गर्दी केली. यावेळी प्रत्येकी एका मेंढीला दोन लाख 38 हजारांचा दर मिळाला. मेंढ्यांना विक्रमी दर मिळाल्याने आनंदीत झालेल्या शेतकऱ्याने मेंढ्यांची हलगीच्या निनादात भव्य मिरवणूक काढून आनंद साजरा केला.
माडग्याळ मधील मेंढ्यांचे रुबाबदार नाक आणि दिसण्यास अत्यंत रुबाबदार असते. विशिष्ट चव आणि स्वाद असलेले या मेंढीचे मांस प्रसिद्ध आहे. त्यामुळे माडग्याळ मेंढीचे दर वाढले आहेत. माळ रानावर आणि दुष्काळी भागात कमीत कमी चारा खाऊन शेतकऱ्याला चांगला भाव मेंढी मिळवून देत आहे. त्यामुळेच माडग्याळचा शेळ्या मेंढ्यांचा बाजार प्रसिद्ध आहे. देशभरातून लोक मेंढ्यांच्या खरेदीसाठी या बाजारात येत असतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात शेळ्यांची आणि मेंढ्यांची खरेदी- विक्री होते.
देशपातळीवर माडग्याळ, मारवाडी, जैसलमेरी या मेंढ्यांच्या जाती मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. माडग्याळ ही मेंढी काटक असते. इतर मेंढ्यांच्या तुलनेत ही मेंढी अधिक रोगप्रतिकारक आहे. मागड्याळ नराचे वजन 40 ते 50 किलो तर मादीचे वजन 35 ते 40 किलो इतके असते. त्यामुळे देशातील अधिक मांस उत्पादन देणाऱ्या मेंढ्यांच्या जातींपैकी माडग्याळ ही जात प्रमुख मानली जाते.
महत्वाच्या बातम्या
- Cucumber Exports : भारत ठरला काकडीचा सर्वात मोठा निर्यातदार
- Fertilizer Price : गेल्या महिन्यात 900 रुपयात मिळणारं पोटॅश खत आज 1800वर कसं? शेतकऱ्यांचे सवाल
- पालघरचा चिकू 24 तासांत दिल्लीत; किसान रेल्वेमुळे शेतकऱ्यांना फायदा
- आटपाडी तालुक्यातील डाळींब शेतीवर 'पिन होल बोरर' किडीचे संकट; बागा काढून काटण्याची शेतकऱ्यांवर वेळ