(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar on Onion : निर्यात शुल्क वाढवून सरकारने कांद्याचे भाव पाडले, शरद पवार यांचा थेट आरोप
Sharad Pawar on Onion Rate : कांद्याचे निर्यात शुल्क वाढवून सरकारने कांद्याचे भाव पाडले आहेत, असा थेट आरोप शरद पवार यांनी केला आहे.
पुणे : कांद्याच्या भाव पडल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असला, तरी शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. कांद्याचे निर्यात शुल्क वाढवून सरकारने कांद्याचे भाव पाडले आहेत, असा थेट आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे. केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र या निर्णयाचा शेतकरी, व्यापारी यांच्यावर परिणाम होणार आहे.
'निर्यात शुल्क वाढवून सरकारने कांद्याचे भाव पाडले'
शरद पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कांदा प्रश्नावरून त्यांनी सरकारला घेरलं. यासोबतच केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर यावरूनही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. कांदा प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, केंद्राने कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लागू केलं आहे. यामुळे कांद्याचे भाव पडले आहेत.
कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क
केंद्र सरकारने शनिवारी कांदा (Onion) निर्यात शुल्काबाबत मोठा निर्णय घेतला असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र यामुळे शेतकरी, व्यापारी, निर्यातदार हे सर्वच संतप्त झाले आहेत. केंद्र सरकारचा हा निर्णय अत्यंत चुकीचा आणि घातक असल्याचं मत ते व्यक्त करत असून या निर्णयाचा फायदा पाकिस्तानला होईल, असं निर्यातदारांचं म्हणणं आहे.
महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी निर्णय?
केंद्र सरकारने शनिवारी कांदा निर्यातीवर शुल्क वाढवणारी अधिसूचना जारी केली. हे नवे नियम 31 डिसेंबर 2023 पर्यंत हे निर्णय लागू राहणार आहे. दरम्यान, शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून या निर्णयाचा विरोध करण्यात येत आहे. दरम्यान, वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्याचा केंद्र सरकारचा हा एक प्रयत्न आहे, असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी म्हटलं आहे. कांद्याची मागणी वाढली असून भविष्यात जर कांद्याची परिस्थिती टोमॅटोसारखी झाली तर, त्यासाठी आपल्याकडे पुरेसा साठा शिल्लक रहावा, या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.
'सत्तेचा गैरवापर सुरु आहे'
जगात काय घडतंय, देशात काय घडतंय त्याची माहितीसाठी सोशल मीडियासारखी साधन महत्वाची आहेत. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जी काही साधने वापरली जात असतील, ती आपण योग्य पद्धतीने वापरली पाहिजे. राज्यकर्ते सत्तेचा वापर करून साधनाचा गैरवापर करतात. देशाच्या महत्त्वाच्या जागेवर ज्या काही व्यक्ती आहेत, त्यातील एका व्यक्तीने सत्तेचा गैरवापर केला जात आहे.'