Ravikant Tupkar : शेतकऱ्यांची थट्टा कराल तर याद राखा, तुमची कार्यालये ठिकाणावर ठेवणार नाही, तुपकरांचा पीकविमा कंपन्यांना इशारा
शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली तर याद राखा, तुमची कार्यालये ठिकाणावर ठेवणार नाही असा इशारा तुपकरांनी पीकविमा कंपन्यांना दिला आहे.
Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांच्या (Ravikant Tupkar) जलसमाधी आंदोलनाच्या धसक्यानं राज्याच्या कृषी विभागाने पीकविमा कंपन्यांना (crop insurance companies) पीकविमा रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळं विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. परंतू काही कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात अत्यल्प पैसे जमा करुन फसवणूक केली जात असल्याचा आरोप रविकांत तुपकरांनी केला आहे. शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली तर याद राखा, तुमची कार्यालये ठिकाणावर ठेवणार नाही असा इशारा तुपकरांनी पीकविमा कंपन्यांना दिला आहे.
राज्यात 40 लाख हेक्टर वरील पिकांचं नुकसान झाले आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा 2 हजार 148 कोटी रुपये पीकविमा मंजूर झाला आहे. त्यापैकी कंपन्यांनी 942 कोटी रुपये जमा केले आहेत. कंपन्यांकडे 1 हजार 205 कोटी रुपये अद्याप बाकी आहे. तसेच पोस्ट हार्वेस्टिंगचा पीकविमा अजून बाकी आहे. परंतू काही ठिकाणी कंपन्यांनी शेतकऱ्यांची क्रूर थट्टा लावली असल्याचा आरोप रविकांत तुपकरांनी केला आहे. काही कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात अत्यल्प पैसे जमा करून फसवणूक केली असल्याचे तुपकर म्हणाले.
अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर कमी पैसे
बुलढाणा जिल्ह्यातील AIC कंपनीनं शेतकऱ्यांनी भरलेल्या प्रीमियम पेक्षाही कमी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे. त्यामुळं स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी या कंपन्यांना इशारा दिला आहे. ज्या शेतकऱ्यांना कमी पैसे आले आहेत, त्या शेतकऱ्यांची जर कंपनीने तत्काळ 100 टक्के नुकसान भरपाईची रक्कम जमा केली नाही, तर AIC कंपनीचे कार्यालय जागेवर ठेवणार नाही असा इशारा तुपकरांनी दिला आहे. तसेच बाकी कंपन्यांचेही कार्यालयात उध्वस्त करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
सोयाबीन आणि कापूस प्रश्नावरुनही तुपकर आक्रमक
सोयाबीन- कापूस (Soybean-Cotton) उत्पादकांच्या मागण्यांबाबत आक्रमक भूमिका घेत जलसमाधी आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत. राज्यस्तरावरील बहुतांशी मागण्या आम्ही तातडीने पूर्णत्वास नेवू तसेच केंद्र शासनासंदर्भात असलेल्या मागण्यांबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू असे आश्वासन राज्य सरकारनं दिल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिली आहे. दरम्यान, पुढच्या 15 दिवसात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसणार असल्याचा इशारा तुपकरांनी दिला आहे.
गुरुवारी (24 नोव्हेंबर) शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह रविकांत तुपकरांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना तुपकरांनी मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा मुंबईकडे कूच करणार असल्याचा इशारा दिला. केंद्र शासनासंदर्भात असलेल्या मागण्यांबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू. तसेच केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत शिष्टमंडळाची बैठक लावू आणि सोयाबीन-कापूस प्रश्नी केंद्र सरकारशी चर्चा करण्यासाठी लवकरच राज्य सरकारचे शिष्टमंडळ घेवून दिल्लीत जाऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: