Monsoon News : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, हिंगोलीत केळीच्या बागा जमीनदोस्त, शेतकऱ्यांना मोठा फटका
राज्यातील अनेक भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. हिंगोली, अमरावती, नाशिकसह कोकणातील काही भागात जोरदार पावसाच्या सरी बरसल्या आहेत. या पावसाचा केळी उत्पादकांना मोठा फटका बसला आहे.
Monsoon News : मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास 12 ते 13 जूनच्या आसपास मान्सून राज्यात येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सध्या कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागांत ढगाळ वातावरण असल्यानं उकाडा चांगलाच वाढला आहे. दरम्यान, राज्यातील अनेक भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. हिंगोली, अमरावती, सातारा नाशिकसह कोकणातील काही भागात जोरदार पावसाच्या सरी बरसल्या आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यातील काही भागातही पावसानं हजेरी लावली, नवी मुंबईतही सकाळापासून या पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसाचा केळी उत्पादकांना मोठा फटका बसला आहे.
हिंगोलीत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं केळीच्या बागांचं मोठं नुकसान झालं आहे. शेकडो एकरवरील केळीच्या बागांचं नुकसान झालं आहे. काल झालेल्या वादळी वाऱ्यात सर्व केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. तर नाशिकच्या मनमाडमध्येही जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं घरांवरील पत्रे उडाले आहेत. अमरावतीच्या धामणगाव इथे टोल प्लाझाचं छप्पर उडालं आहे. उत्तर रत्नागिरीत मेघगर्जनेसह मुसळधार पावसानं हजेरी लावली. काल संध्याकाळी चिपळूण, खेड, दापोलीत पावसानं दमदार हजेरी लावली. सातारा जिल्ह्यातील काही भागात रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यात महाबळेश्वरला जाणाऱ्या पसरणी घाटात धुक्याची चादर पसरलेली पसरली असून अनेक ठिकाणी घाट रस्ते या धुक्यात हरवले होते. या धुक्यातून वाट काढत पर्यटक मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत.
केळीच्या बागा भुईसपाट
हिंगोली जिल्ह्यातल्या कुरुंदा गावाच्या शिवारात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. जोरदार झालेल्या पावसाने सखल भागात पाणी साचले होते तर उकाड्याने त्रस्त नागरिकांना या पावसानं दिलासा मिळाला आहे. परंतू वारे जोरदार असल्यानं मोठ्या प्रमाणावर झाडे मोडून पडली आहेत. रस्त्यावर उभा असलेला एक ऑटोरिक्षासुद्धा या वाऱ्यामुळं रस्त्याच्या खाली जाऊन पडला आहे. जोरदार झालेल्या या वादळी वाऱ्यामुळं नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे. तर या पावसानं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. कुरुंदा गिरगाव भाग म्हणजे केळीचे उत्पादन घेणारा शेतीचा भाग आहे. परंतू या वादळी वाऱ्यानं या भागातील केळीच्या अनेक बागा भुईसपाट झाल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे.
पहिल्याच वादळात टोल प्लाझाचं छप्पर उडालं
नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहर परिसरात देखील पावसानं जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह मनमाडमध्ये पाऊस झाला. वाऱ्यामुळे काही घरांवरील पत्रे उडाले आहेत. तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली. समृद्धी महामार्गावरील धामणगाव रेल्वेजवळ टोल प्लाझाचं छप्पर पहिल्याच वादळात उडालं आहे. महामार्ग सुरु होण्यापूर्वीच टोल प्लाझाचं छप्पर उडाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Monsoon Update : 15 जूनपासून मान्सून वेग पकडणार, पश्चिम आणि मध्य भारतात उष्णतेची लाट कायम
- Agriculture News : मशागतीची कामं सुरु, खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज, बियाण्यांचं काय?