PM Kisan Yojana : PM किसानचा 13 वा हप्ता लवकरच, 'या' शेतकऱ्यांना दोन नाहीतर चार हजार रुपये मिळणार
PM Kisan Yojana : PM किसान सन्मान निधी योजने अंतर्गत आत्तापर्यंत 12 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. 13 वा हप्ता कधी जमा होणार याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
PM Kisan Yojana : केंद्र सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी PM किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) सुरु केली आहे. या योजनेद्वारे प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना (Farmers) 6 हजार रुपये दिले जातात. प्रत्येक चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला जातो. आत्तापर्यंत 12 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. 13 वा हप्ता कधी जमा होणार याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. दरम्यान, काही शेतकऱ्यांना 13 वा हप्ता हा चार हजार रुपयांचा मिळणार आहे.
'या' शेतकऱ्यांना मिळणार 4 हजार रुपयांचा हप्ता
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून (PM Kisan Samman Nidhi Yojana) अनेक अपात्र शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे. सध्या ही संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. कारण अद्याप काही शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदणीची पडताळणी पूर्ण केली नाही. शेतकऱ्यांना ई-केवायसी करणं अनिवार्य आहे. पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळं अनेक शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्याचे 2 हजार रुपये मिळू शकले नाहीत. मात्र आता मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी पडताळणी करून घेतली आहे. तसेच ई-केवायसी पूर्ण केली आहे. त्यामुळं त्यांना आता फक्त 13 व्या हप्त्याचे 2 हजार रुपयेच मिळणार नाहीत. तर त्यांना 12 आणि 13 व्या हप्त्याचे मिळून 4 हजार रुपये मिळणार आहेत.
कधी जमा होणार 13 वा हप्ता
मागील वर्षी PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता 1 जानेवारीला म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बँक खात्यात जमा करण्यात आला होता. परंतू, यावर्षी जमिनीच्या नोंदी आणि ई-केवायसी प्रक्रियेची पडताळणी करण्यात विलंब झाल्यामुळं सन्मान हस्तांतरित करण्यास थोडा वेळ लागत आहे. दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 26 जानेवारी ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. हप्ता कधी मिळणार याबाबत सरकारने अधिकृत कोणतेही वक्तव्य केलं नाही. PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 3 ते 4 महिन्यांच्या अंतराने दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. मकर संक्रांतीपूर्वी (Makar Sankranti) म्हणजे 15 जानेवारीच्या आत 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. याबाबतची माहिती सुत्रांनी दिली होती. मात्र, अद्याप हप्ता जमा झालेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या:
PM Kisan : 'या' सणापूर्वी मिळणार PM Kisan योजनेचा 13 वा हप्ता, वाचा काय आहेत अपडेट्स