Orchid Flower Success Story: ऑर्किड फुल शेतीतून पहिल्याच वर्षी नऊ लाखांचं उत्पन्न, थायलंडहून रोपटे आणून केली माती विरहीत शेती; वाचा यवतमाळच्या जवाहर राठोड यांची यशोगाथा
Orchid Flower Success Story : थायलंड येथून रोपटे आणून नारळाच्या सेलमध्ये माती विरहीत शेती केली. त्या ऑर्किड रोपट्याला आता फुलं आली असून, त्याला बाजारपेठेत चांगली मागणी आहे.
यवतमाळ : सध्या शेतकरी (Farmers) आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन भरघोस उत्पादन घेत आहेत. असाच एक वेगळा प्रयोग विदर्भात प्रथम जवाहर राठोड यांनी केला आहे. दारव्हा तालुक्यातील जवळा येथील प्रगतीशील शेतकर्याने ऑर्किड (Orchid Flower) फुल शेतीतून भरघोस आर्थिक उत्पन्न मिळवले आहे. विशेष म्हणजे थायलंड (Thailand) येथून रोपटे आणून नारळाच्या सेलमध्ये माती विरहीत (Soil Less) लागवड केली. त्या ऑर्किड रोपट्याला आता फुलं आले असून, त्याला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. पहिल्याच वर्षी आठ ते नऊ लाख रुपये उत्पन्न होण्याची आशा शेतकर्याने व्यक्त केली आहे.
जवाहर राठोड असे प्रगतीशील शेतकर्याचे नाव असून ते दारव्हा तालुक्यातील जवळा येथील रहिवासी आहे. त्यांच्याकडे असलेल्या एका एकर शेतीत त्यांनी ऑर्किड फुल शेती करण्याचे ठरवले. परंतु, यवतमाळ जिल्ह्यात उष्ण तापमान असल्याने शेती फुलणार नाही, असे अभ्यासकांनी सांगितले. सुरुवातीला निराशा आली. तरी राठोड दाम्पत्याने तीन दिवसाचे प्रशिक्षण घेतले. काही झाले तरी चालेल एक पाऊल पुढे टाकायचे असे ठरवून ऑर्किड फुलशेती करण्याचा निश्चय केला.
थायलंड येथून आणले ऑर्किडचे रोपटे
शेतात पॉलीहाऊस बांधून पुणे येथील कंपनीच्या माध्यमातून थायलंड (Thailand) येथून ऑर्किडचे रोपटे बोलावले. हे रोपटे मातीत लागत नाही. त्याची लागवड कोकोसेलमध्ये करावी लागते. कोकोसेल आणि पाणी यावरच ऑर्किडचे रोपटे जगते. सहा महिन्यात ऑर्किड फुलशेती बहरली असून पहिल्याच वर्षी आठ ते नऊ लाख रुपये उत्पन्न येण्याची अपेक्षा शेतकर्याला आहे. पुढील वर्षी वीस लाखाच्या घरात उत्पन्न येण्याचा आशा शेतकर्याने व्यक्त केली आहे. या फुलशेतीमुळे आठ ते नऊ जणांना रोजगार मिळाला आहे. या फुलाला दिल्ली मुंबई, हैदराबाद, नागपूर येथे मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शेतकर्यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत नवीन तंत्रज्ञान आत्मसाद केल्यास इतरही शेतकरी आर्थिक उन्नती करू शकतात.
पारंपारिक शेती आणि पीकपद्धतींच्या मळलेल्या वाटा सोडत नव्या पायवाटा शोधणं गरजेचं आहे. ऑर्किट फुल शेकी याच नव्या पायवाटेवरील शेतकरी उत्कर्षाचा नवा राजमार्ग ठरु शकतो. जवाहर राठोड यांच्या प्रयोगाची पंचक्रोशीत चर्चा होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :