Sadabhau Khot : कांदा उत्पादकांचा आक्रोश, 5 जूनला नाशिकमध्ये कांदा परिषद, सदाभाऊ खोतांचा सरकारला इशारा
सध्या कांद्याचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. याविरोधात रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
Sadabhau Khot : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याला खूप कमी दर मिळत असल्यानं उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. या मुद्यावरुन विविध शेतकरी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. अशातच रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातल्या प्रत्येक अश्रूचा हिशोब ह्या आघाडी सरकारला द्यावाच लागेल असे खोत म्हणालेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी 5 जूनला कांदा परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती खोत यांनी दिली आहे.
'जागर शेतकऱ्याचा आक्रोश कांदा उत्पादकांचा'
आता आपण स्वस्थ बसून राहणार नाही. शेतकऱ्यांच्या डोळ्यातल्या प्रत्येक अश्रूचा हिशोब ह्या आघाडी सरकारला द्यावाच लागेल. त्यामुळे आम्ही 'जागर शेतकऱ्याचा आक्रोश कांदा उत्पादकांचा' करणार असल्याचे खोत म्हणाले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामध्ये रुई या गावात 5 जून 2022 रोजी भव्य कांदा परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे उपस्थित राहणार आहेत.
कांद्याला प्रतिकिलोला पाच रुपयांचे अनुदान द्यावं
सध्या कांद्याचे दर हे 1 रुपये ते 3 रुपयापर्यंत आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत आहे. काही ठिकाणी कांदा उत्पादकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कांदा जनावरांना शेतकरी खाऊ घालत आहे. त्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचताना दिसत नाही. कांद्याच्या दराबाबत सहकार आणि पणन मंत्र्यांनी बैठक घेणं गरजेचे होतं मात्र, तसे झाले नसल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. कांद्याला अनुदान देणं गरजेचे होते, देवेंद्र फडणवीस सरकारने कांद्याला प्रतिकिलो दोन रुपये अनुदान दिले होते. गुजरात सरकारने कांदा उत्पादकांना तीन रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे राज्य सरकारनं कांद्याला प्रतिकिलोला पाच रुपयांचे अनुदान द्यावे अशी सेतकऱ्यांची मागणी आहे. याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचे खोत म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी कांदा प्रश्नी बैठक घ्यावी
जून महिन्यात नवीन कांद्याची लागवड होणार आहे. अशा वेळी कांद्याला दर नसल्यामुळे शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज मिळणार नाही. त्यामुळं अनेक शेतकरी सावकरांच्या दारी जातील. सावकरांच्या गळफासात शेतकरी अडकले जातील, असे खोत यावेळी म्हणाले. म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थोडंस गावाकडं बघावं, शेतकऱ्यांकडे बघावं, त्यांना वेळ नसेल तर त्यांनी ऑनलाईन कांदा उत्पादकांसाठी एखादी बैठक घ्यावी. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मदत करावी असे ते म्हणाले. सरकार डोळेझाक करत असेल तर आम्ही याविरोधात आवाज उठवू असा इशारा खोत यांनी यावेळी दिला.
महत्वाच्या बातम्या: