(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Milk Producers Association : दूध उत्पादकांच्या प्रश्नांवर केरळमध्ये होणार चर्चा, 21 राज्यांचे प्रतिनिधी केरळमध्ये दाखल
दूध उत्पादकांच्या समोर असणाऱ्या आव्हानांसह विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी केरळमध्ये दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
Milk Producers Association News : दूध उत्पादकांच्या संघटनेचा देशव्यापी समन्वयन करण्यासाठी केरळमध्ये दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. केरळमधील कोझिकोड याठिकाणी ही कार्यशाळा सुरु आहे. या कार्यशाळेसाठी देशभरातील 21 राज्यांमधून प्रतिनिधी सहभागी झाले असून, महाराष्ट्रातूनही काही प्रतिनिधी या कार्यशाळेसाठी गेले आहेत. दूध उत्पादकांच्या समोर असणाऱ्या आव्हानांसह विविध मुद्यांवर या परिषदेत चर्चा होणार असल्याची माहिती किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले (Ajit Nawale) यांनी दिली आहे.
या प्रमुख विषयांवर होणार चर्चा
या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये विविध विषयावर चर्चा होणार आहे. यामध्ये दूध उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये सहकारी क्षेत्राचे महत्त्व, कॉर्पोरेट कंपन्यांनी दूध क्षेत्रात उभी केलेली आव्हाने, दूध उत्पादकांच्या लुटमारी विरोधात सुरु असलेले देशव्यापी संघर्ष व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यामध्ये दुग्ध व्यवसाय कशाप्रकारे आपली भूमिका पार पाडू शकतो आदी विषयांवर या कार्यशाळेमध्ये विचारमंथन होणार आहे. दुधाला एफ.आर.पी. चे कायदेशीर संरक्षण मिळावे, दुग्ध पदार्थांच्या निर्मितीमध्ये निर्माण होणाऱ्या उत्पन्नात शेतकऱ्यांना वाटा मिळावा, दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीवर निर्बंध घालावेत व निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, दुधाचा उत्पादन खर्च कमी करावा, दूध भेसळीवर लगाम लावावा यासारख्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती अजित नवले यांनी दिली. या मागण्यांसाठी देशस्तरावर संघर्ष व एकजूट मजबूत करण्यासाठी या कार्यशाळेचा नक्कीच उपयोग होईल, असे मत अजित नवले यांनी व्यक्त केले.
कोझिकोड शहरामध्ये दूध उत्पादकांच्या संघटनांचे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 14 व 15 मे 2022 रोजी संपन्न होत आहे. किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी कार्यशाळेचे उदघाटन केले आहे. या कार्यशाळेसाठी देशभरातील 21 राज्यांमधून प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रामधून या कार्यशाळेसाठी डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, डॉ. शिवानंद झळके, सुदेश इंगळे, संजय जाधव सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रात दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी विविध संघटनांना एकत्र करत स्थापन झालेल्या व गेली सहा वर्ष दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी संघर्ष करत असलेल्या दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनांचे अनुभव यावेळी महाराष्ट्राच्या वतीने कार्यशाळेमध्ये मांडण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील दूध उत्पादकांच्या विशिष्ट मागण्याही या कार्यशाळेमध्ये शिष्टमंडळाच्या वतीने ठेवण्यात येतील असे नवलेंनी सांगितले.