चिंता वाढली! मराठवाड्यात 'ऑगस्ट महिन्यात' पावसाची 71.9 टक्क्यांची तुट; 49 लाख हेक्टरवरील पिकं धोक्यात
Marathwada Rain Update : अशा परिस्थितीत विभागातील 49 लाख हेक्टरवरील पिकं धोक्यात आली आहे.
Marathwada Rain Update : मागील 20 दिवसांपासून मराठवाड्यात (Marathwada) पावसाचा (Rain) खंड पाहायला मिळत आहे. तुरळक ठिकाणी सोडलं तर विभागात कोठेही पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मराठवाड्यात ऑगस्ट महिन्याच्या मागील 20 दिवसांत केवळ 35.1 मिमी पाऊस झाला आहे. म्हणजेच फक्त 28.1 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे मराठवाड्यात ऑगस्ट महिन्यात 71.9 टक्के तुट पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत विभागातील 49 लाख हेक्टरवरील पिकं धोक्यात आली आहे.
पावसाची स्थिती...
- यावर्षी मराठवाडा विभागात उशिरा मान्सून दाखल झाल्याने 10 जूनऐवजी 25 जूनला मान्सूनचे आगमन झाले.
- मराठवाड्यातील 30 जूनपर्यंतची आकडेवारी पाहिली तर, 134 मिमी अपेक्षितपावसाच्या तुलनेत केवळ 55.5 मिमी म्हणजेचं 41.4 टक्केच पाऊस पडला.
- जुलै महिन्यात 182.2 मिमीच्या तुलनेत 272.5 मिमी म्हणजेच 49 टक्के जास्त पाऊस पडला.
- मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने मागील 20 दिवसांत 28.1 टक्के पाऊस झाला असून, 71.9 टक्के तुट पाहायला मिळत आहे.
विभागात पावसाची तुट...
जिल्हा | पावसाची तुट |
परभणी | 40 टक्के |
औरंगाबाद | 29.8 टक्के |
जालना | 31.6 टक्के |
बीड | 25.4 टक्के |
लातूर | 21.2 टक्के |
उस्मानाबाद | 23.5 टक्के |
हिंगोली | 14.6 टक्के |
नांदेड | 14 टक्के जास्त पाऊस |
शेतकऱ्यांची चिंता वाढली...
गेल्यावर्षी अतिवृष्टी आणि त्यानंतर परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ज्यात खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामाचे पिकं जवळपास हातचे गेले होते. मात्र, यंदा काही तरी हाती लागेल अशी अपेक्षा असतानाच मान्सून उशिरा दाखल झाला. त्यात जून महिना कोरडा गेला. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने पेरण्या झाल्या. पण ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाने दडी मारली. त्यामुळे अनेक भागात पावसाचा 20 दिवसांचा खंड पाहायला मिळत आहे. त्यामुळेशेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आता पिकांना पावसाची अत्यंत गरज असतांना पाऊस पडत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत पाऊस न झाल्यास खरीपाच्या पिकांना मुकावे लागणार आहे. विशेष म्हणजे यामुळे शेतकऱ्यांच्या मोठे नुकसान होणार आहे.
पाणी टंचाईचा सामना करावा लागणार...
पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना फटका बसत असतांना, याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना देखील बसणार आहे. कारण अनेक प्रकल्पातील पाणी आटले असून, काही ठिकाणी अल्प पाणीसाठा शिल्लक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात जोरदार पाऊस न झाल्यास मराठवाड्यात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळू शकते.
इतर महत्वाच्या बातम्या:
Rain Update : 'अब तो ना गरजता है, ना बरसता है'; हवामान विभागाच्या अंदाजानंतरही पावसाची दडी