Sugarcane: पावसाळा तोंडावर असताना मराठवाड्यात 2 लाख 80 हजार टन ऊस गाळपाविना;शेतकरी हतबल
मराठवाड्यातील अतिरिक्त ऊस प्रश्नी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. ऊस कारखान्यात जाण्याची आशा मावळल्याने शेतकऱ्यांवर शेतातील उभा ऊस पेटवून देण्याची वेळ आली आहे.
Extra Sugarcane in Marathwada: राज्यात उसाचा एकही टिपरू राहू देणार नाही असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. मात्र पावसाळा तोंडावर आला असतानाही शेतकऱ्यांच्या शेतातील उभा ऊस अजूनही तसाच आहे. औरंगाबाद, जालना व बीड या जिल्ह्यांसह मराठवाड्यात आजघडीला 2 लाख 80 हजार टन ऊस गाळपाविना शिल्लक आहे. तर अनेक कारखान्यांनी ऊस गाळप बंद केले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
राज्यात ऊसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणावर ऊसाची लागवड केली. त्यामुळे यावर्षी ऊसाचे विक्रमी उत्पन्न झाले. त्यामुळे पावसाळा तोंडावर आला असतानाही शेतकऱ्यांच्या ऊस शेतात उभा आहे. अनेक कारखाने बंद झाले आहेत. मजूर यायला तयार नाहीत. त्यात सुरु असलेले कारखान्यात सुद्धा नंबर लागत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. तर अनेक शेतकऱ्यांनी शेतातील उभ्या ऊसाला आग लावली आहे. दुसरीकडे ऊस जात नसल्याने शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना सुद्धा समोर आल्या आहेत. अशीच काही परिस्थिती मराठवाड्यात पाहायला मिळत आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती गाळप...
औरंगाबाद जिल्ह्यातील 7 कारखान्यांनी 28 लाख 55 हजार 244 टन उसाचे गाळप करून 29 लाख 80 हजार 710 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. जालना जिल्ह्यातील 5 कारखान्यांनी 28 लाख 28 हजार 355 टन उसाचे गाळप करून 29 लाख 77 हजार 400 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. बीड जिल्ह्यातील 7 कारखान्यांनी 46 लाख 84 हजार 893 टन उसाचे गाळप करून 40 लाख 65 हजार 370 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. परभणी जिल्ह्यातील 6 कारखान्यांनी 43 लाख 43 हजार 177 टन गाळप करून 42 लाख 10 हजार 295 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. हिंगोली जिल्ह्यातील 5 कारखान्यांनी 21 लाख 48 हजार 8 टन उसाचे गाळप करून 20 लाख 50 हजार 31 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. तर मराठवाड्यात अजूनही 2 लाख 80 हजार टन ऊस गाळपाविना शिल्लक आहे.