Maharashtra Rains : राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी, पुढील तीन दिवस पावसाचा इशारा
सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, राज्यातील काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे.
Maharashtra Rains : सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. मात्र, राज्यातील काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. तसेच देशातील विविध भागात देखील दमदार पाऊस पडत असताना दिसत आहे. देशातील कर्नाटक, केरळसह राजधानी दिल्लीत पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तर राज्यातील मुंबईसह ठाणे, पुणे, सातारा, धुळे, लातूर या परिसारत पाऊस झाला आहे. दरम्यान, येत्या तीन दिवसांत राज्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह घाट परिसरात, काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी, काही ठिकाणी मुसळदार पावसामामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावासाचा खूप मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेती पिकं वाया गेली आहेत. तर काही ठिकाणी जमिनी खरवडून गेल्या आहेत. त्यामुळं बळीराजा संकटात सापडला आहे. राज्यात जवळपास आठ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पिकाचे नुकसान झाले आहे.
धुळे पाऊस
धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पिके सडण्याचा धोका वाढला आहे, मात्र अद्यापही शासनाकडून पंचनामे सुरू करण्यात आलेले नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. धुळे शहरासह जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरीच्या तुलनेत 103 टक्के पाऊस झाला असून साक्री तालुक्यात सर्वाधिक पावसाने हजेरी लावली आहे. तर शिंदखेडा तालुक्यात आणि शिरपूर तालुक्यात पावसाची अत्यंत कमी हजेरी लागली आहे. शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा चिमठाणे तर शिरपूर तालुक्यातील जवखेडा होळनाथे मंडळात अत्यल्प पाऊस झाला आहे. या भागात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचे प्रमाण वाढल्याने पिके करपू लागली आहेत. साक्री तालुक्यात जास्त पाऊस झाल्याने शेतात पाण्याचा निचरा होत नसल्याने पिके सडण्याचा धोका वाढला आहे.
धुळे जिल्ह्यातील 39 मंडळांपैकी 16 मंडळात 100 टक्क्यांपेक्षा अधिक साक्री तालुक्यात दोन मंडळात 200 टक्क्यांपेक्षा जास्त तर पाच मंडळात 70 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. साक्री तालुक्यात जवळपास 418 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असून शेतात पाणी शिरल्याने कापूस, तूर, मका, ज्वारी, बाजरी आदी पिके सडण्याचा धोका वाढला आहे.