Dhule : उन्हाच्या तीव्रतेचा फटका, शिरपूर तालुक्यात उन्हाळी कांद्याचे उत्पादन घटणार
Onion : उन्हाळी कांदाही करपा, उन्हाची तीव्रता, उशिरा आवर्तन, उशिरा लागवड, अवकाळी पाऊस यांच्या संकटात सापडला आहे.
धुळे : धुळे जिल्ह्यातील विविध भागात उन्हाळी कांद्याला करपा रोगाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून तब्बल तीस हजार हेक्टर वरील कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे उन्हाळी कांद्याचे उत्पादन घटणार असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे
गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांचा लाल कांद्यातून खर्च देखील वसूल होत नाही. उन्हाळी कांदाही करपा, उन्हाची तीव्रता, उशिरा आवर्तन, उशिरा लागवड, अवकाळी पाऊस यांच्या संकटात सापडला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी उन्हाळी कांद्याचे उत्पादन घटणार आहे. कारण करपा, बोगस बियाणे, पंधरा दिवसापासून अतितीव्र उष्णता व शिरपूर तालुक्यात अनेक भागात कंरवद डावा कालव्याचे आवर्तन उशीरा झाली आहे. शेकडो हेक्टरवरील कांदा संकटात सापडल्याने मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादनात घट येणार आहे.
पंधरा दिवसातून येणारे ढगाळ वातावरण, वादळी पाऊस, करपा रोग त्याचा परिणाम उन्हाळी कांद्यावर झाला आहे. मोठ्या प्रमाणात औषधांच्या फवारण्या कराव्या लागत आहे. तसेच उन्हाळी कांद्याने परिपक्व होण्याअगोदर माना टाकल्याने त्याचा परिणाम कांदा उत्पादनावर होणार आहे. मोठ्या प्रमाणात केलेल्या खर्चातून म्हणावे असे उत्पादन निघणार नसल्याने खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच अपरिपक्व कांदा, गारपीटीत सापडलेला कांदा जास्त दिवस टिकत नसल्याने त्याचा परिणाम कांदा साठवणुकीवर होणार आहे. यावर्षी मजुरांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा शेतकऱ्यांना भासू लागला असून चालू हंगाम वाया जातो की काय? या भीतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात मजुरी देऊन कांदा लागवड केली. तसेच अनेक शेतकऱ्यांची कांदा बियाण्यात फसवणूक झाली आहे.
या संकटाबरोबरच गेल्या पंधरा दिवसापासून थंडीचे प्रमाण कमी होऊन मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाल्याने त्याचा परिणाम कांदा परिपक्व होण्यावर झाला आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याची कमतरता भासत असून चार दिवसाआड पाणी द्यावा लागत असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींनी तळ गाठल्याने त्याचा परिणाम उन्हाळी कांद्यावर होत आहे.
फेब्रुवारी महिन्यातील कांदा लागवड संकटात
यावर्षी मोठ्या प्रमाणात मजुरांची टंचाई भासल्याने शेतकऱ्यांच्या कांदा लागवडी उशीर झाली. अनेक शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात कांदा लागवडी केल्या परंतु त्या कांदा लागवडी अतिउष्ण तापमान ,थंडीची कमतरता भासत असल्याने कांद्याचा आकार बारीक झाली आहे. परिपक्वतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे
मजुरांच्या टंचाईमुळे यावर्षी उन्हाळी कांद्याला उशीर झाला आहे. मध्यंतरी फेब्रुवारी महिन्यात वातावरण चांगले असल्याने कांदा पिक सुधारले होते. परंतु दहा-बारा दिवसापूर्वी ढगाळ वातावरणामुळे कांदा पिक करपा रोगाच्या विळख्यात सापडले आहे. गेल्या पंधरा दिवसापासून उन्हाची तीव्रता वाढल्याने कांदा वाढीवर परिणाम झाला असून उत्पादनात घट येणार आहे अशी माहिती अनिल निकुंभ तालुका कृषी अधिकारी यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या :
Onion Prices Fall : कांद्याच्या दरात घसरण झाल्यानं बळीराजाच्या डोळ्यात पाणी, लहरी वातावरणामुळं उत्पन्नातही घट
Cotton Price : पांढऱ्या सोन्याला 'झळाळी', अकोट बाजारात कापसाला इतिहासातील आत्तापर्यंतचा विक्रमी दर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha