Cotton Price : पांढऱ्या सोन्याला 'झळाळी', अकोट बाजारात कापसाला इतिहासातील आत्तापर्यंतचा विक्रमी दर
अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला उच्चांकी दर मिळाला आहे. त्यामुळं कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन आले आहेत.
![Cotton Price : पांढऱ्या सोन्याला 'झळाळी', अकोट बाजारात कापसाला इतिहासातील आत्तापर्यंतचा विक्रमी दर Cotton Price news A record price for cotton at Akot Bazar Samiti in Akola district Cotton Price : पांढऱ्या सोन्याला 'झळाळी', अकोट बाजारात कापसाला इतिहासातील आत्तापर्यंतचा विक्रमी दर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/26/7a49ca128ea5dd07013b191c444cd723_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Cotton Price : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 'अच्छे दिन' आले आहेत. कारण सध्या कापसाच्या भावानं प्रती क्विंटल 12 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत काल कापसाला क्विंटलला तब्बल 12 हजारांचा भाव मिळाला आहे. हा कापसाच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वाधिक आणि विक्रमी असा भाव आहे. लवकरच कापूस 13 हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता व्यक्त केली आहेत. कापसाला चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
अलिकडच्या काही वर्षांत कापूस उत्पादक शेतकरी बोंडअळी, ओला दुष्काळ आणि नापिकीच्या फेऱ्यात अडकला होता. यावर्षीच्या हंगामातील कापसाला मिळत असलेल्या भावानं शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंद अन उमेदीची नवी पालवी फुलली आहे. यावर्षी सीसीआयनं कापसाच्या मध्यम धाग्याला 5 हजार 775 तर लांब धाग्याला 6 हजार 100 एवढा हमीभाव जाहीर केला आहे. त्यामुळं सध्या अकोटमध्ये हमीभावापेक्षा क्विंटलमागे जवळपास 6 हजार अधिक भाव शेतकऱ्यांना मिळत आहे.
कापूस भाववाढीचा 'अकोट पॅटर्न'
सध्या अकोला जिल्ह्यातील अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात कापसाच्या गाड्यांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. कापूस विक्रीच्या लिलावात चढ्या भावानं लावली जाणारी बोली हे येथे अलीकडच्या दशकभरात कापसासंदर्भात आश्वासक चित्र अभावानच पाहायला मिळतं आहे. बोंडअळी, अतिवृष्टी आणि नापिकीमुळे गेल्या अनेक वर्षांत कापूस हंगाम संकटात होता. त्यामुळं कापूस उत्पादक शेतकरी कायम सैरभैर अवस्थेतच असायचा. मात्र, यावर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आयुष्यात अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच आनंद फुलला आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीत आपला कापूस विकायला आणलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत आहे. कारण, त्याच्या कापसाला प्रति क्विंटल अकरा ते बारा हजारांपर्यंत भाव मिळतो आहे.
अमरावती विभागातील अकोल्यासह अमरावती, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी आपला कापूस अकोटमध्ये विकायला आणत आहेत. त्यामुळे सध्या अकोटच्या बाजारपेठेत सध्या दररोज साडेतीन ते चार हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे. त्यामुळे शेतकरी अकोटमध्ये कापूस विकायला प्राधान्य देत आहेत. काल या भावानं बारा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. अकोटमध्ये कापसाला मिळत असलेल्या चांगल्या भावामुळं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधनाचं हसू आलं आहे.
हमीभावापेक्षा 6 हजारांपर्यंतचा अधिक दर
यावर्षी सीसीआयनं कापसाच्या मध्यम धाग्याला 5 हजार 775 तर लांब धाग्याला 6 हजार 100 एव्हढा हमीभाव जाहीर केला आहे. त्यामुळे अकोटमध्ये हमीभावापेक्षा क्विंटलमागे 6 हजार रुपयांपेक्षा अधिक भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. यासोबतच अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इतर बाजार समित्यांच्या तुलनेत हजार रुपयांपर्यंत अधिक दर मिळत आहे.
अकोटमध्ये अधिक भाव मिळण्याचं कारण काय
अकोट बाजार समितीत दरवर्षीच इतर बाजार समित्यांपेक्षा कापसाला अधिक दर मिळतो. अकोट बाजार समितीत सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांत कापसाचा लिलाव केला जातो. कापूस विकल्यानंतर शेतकऱ्यांना व्यापाऱ्याकडून लगेच पावती अन संबंधित रकमेचा धनादेश दिला जातो. ही संपूर्ण प्रक्रीया बाजार समितीच्या पुढाकारानं होत आहे. यामुळे शेतकरी विश्वासानं आपला कापूस अकोटच्या बाजार समितीत आणत आहेत. अकोटमध्ये कापसाला अधिक दर मिळण्याचे प्रमुख कारण म्हणजे अकोटमध्ये जिनिंगचे तब्बल 20 युनिट आहेत. येथील जिनिंगला दररोज 15 हजार क्विंटल कापसाची आवश्यकता पडते. अकोट बाजार समितीत कापूस खरेदी केल्यानंतरही या युनिट्सला बाहेरून कापूस खरेदी करावा लागतो.
या भागातील कापसांच्या गाठीची चीन आणि बांग्लादेशात निर्यात
अकोटचा समावेश असलेल्या वऱ्हाडातील कापसात रुईचे प्रमाण अधिक आणि सरकीची जाडी कमी आहे. यामुळे बाजारात या कापसाला चांगलीच मागणी आहे. याच कारणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात या भागातील कापसाला चांगली मागणी आहे. येथील कापूस पुढे बांग्लादेश आणि चिनमध्येही निर्यात होतो.
पुढच्या काही दिवसांत कापसाचे दर 13 हजारांचा टप्पा ओलांडणार
कापूस बाजारात सध्या मोठी तेजी आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे कापसाचा कमी झालेला पेरा आणि वाढलेली मागणी. त्यामुळे कापूस बाजारातील सध्याच्या तेजीचा रोख बघता लवकरच कापूस प्रती क्विंटल 13 हजारांचा टप्पा सहज ओलांडणार, अशी शक्यता कापूस क्षेत्रातील तज्ञ आणि अभ्यासक व्यक्त करीत आहेत.
'कापूस कोंड्याची गोष्ट' म्हणून कापसाच्या पिकाची गेल्या दोन दशकांत चांगलीच अप्रतिष्ठा झाली आहे. सरकारी धोरणं, योग्य बाजारभाव अन बाजारातील विक्री-लिलाव पद्धतीत पारदर्शकता आणली तर हे पांढरं सोनं पुन्हा चकाकू लागेल. शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव देत त्यांच्या श्रमाचे मोल करणारा या 'अकोट पॅटर्न'चं इतर ठिकाणीही अनुकरण होणं गरजेचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)