Maharashtra Mumbai Rain : राज्याच्या विविध भागात पावसाची जोरदार हजेरी, गडचिरोलीत अतिवृष्टीचा इशारा
राज्यातील मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापुरात या भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच गडचिरोली, वाशिम, वर्धा या ठिकाणी देखील चांगला पाऊस पडत आहे.
Maharashtra Mumbai Rain : राज्याच्या विविध भागात पावसानं कहर केला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे. तर काही ठिकाणी गावात पाणी शिरल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. राज्यातील मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापुरात या भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच गडचिरोलीमध्ये देखील पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. तिथे अनेक नद्यांना पूर आला आहे. तसेच नागपूर, चंद्रपूर, वाशिम, वर्धा जिल्ह्यातही मोठा पाऊस कोसळताना दिसत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा कहर
राज्यात विविध ठिकाणी चांगलाच पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात पावसानं कहर केला आहे. भामरागड-आलापल्ली मार्गावरील अनेक छोट्या नाल्यांना पूर आला आहे. त्यापैकी तूमर्गुंडा नाल्यावर पर्यायी रस्ता वाहून गेल्यानं या परिसरातील लोकांना मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे. या नाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून, या भागातील लोक आपला जीव मुठीत धरुन पुराच्या पाण्यातून मोटार सायकल खांद्यावर घेऊन या प्रवाहातून जीवघेणा प्रवास करत आहेत. तर दुसरीकडे चंद्रा गावाजवळील नाल्यावरुन देखील पाणी वाहत होते. दरम्यान, पुढील तीन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
नागपूरमध्ये दमदार पाऊस
नागपूरमध्येही दमदार पावसानं हजेरी लावली. त्यामुळं शहरातील अनेक भागात पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं. नागपूरच्या पडोळे चौकात रिंगरोडवर गुडघाभर पाणी साचल्यामुळं एका बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद पडली. यावेळी वाहन चालक अडकून पडू नये, म्हणून स्थानिक नागरिक तसेच तरुण लोकांना मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यांनी एका बाजूची वाहतूक बंद करत येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना रस्ता दाखवत मार्ग काढून देण्याचे काम केले.
यवतमाळ जिल्ह्यातही जोरदार पावसाची हजेरी
गेल्या तीन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळं अनेक नदी नाले दुथडी भरुन ओसंडून वाहत आहे. राळेगाव तालुक्यातील लाडकी गावात मुसळधार पाऊस झाल्याने गावातून वाहणाऱ्या नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत आहे.
चंद्रपूर पाऊस
मुसळधार पावसाने चंद्रपूरला देखील झोडपले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. जिल्ह्यातील जीवती- पोंभूर्णा -गोंडपिपरी- वरोरा- मूल या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने जलमय स्थिती झाली आहे. चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गांवर पाणीच पाणी आहे. महत्त्वाच्या वाहतूक शाखा टी पॉईंटवर नाल्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा आला आहे. हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्याला 72 तासांचा रेड अलर्ट दिली आहे.
वाशिम आणि वर्ध्यातही जोरदार पाऊस
वाशिम जिल्ह्यातही सकाळपासून हलका ते मध्यम स्वरुपाचा पावसाला सुरुवात झाली आहे. तर वर्धा जिल्ह्यात 10 ते 14 जुलैपर्यंत जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होईल असा अंदाज सांगण्यात आला आहे. या काळात वर्धा जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केलं आहे.