Crop Insurance : केवळ एक रुपयात पिक विमा पण, वेबसाईट वारंवार हँग; विमा भरावा तरी कसा? राज्यातील लाखो शेतकरी संभ्रमित
Maharashtra Govt's Crop Insurance Website Issue : एक कोटी 17 लाख शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील उभे पिकाचा विमा उतरवला आहे. आणखी शेतकरी पिक विमा भरण्यासाठी रोज सीएससी सेंटरच्या चकरा मारत आहेत.
Maharashtra News : राज्यातील शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी पहिल्यांदाच राज्य सरकारने जबाबदारी घेतली. सरकारच्या या योजनेतून एक रुपयांमध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतातील उभ्या पिकाचा विमा उतरवता येणार आहे. मात्र, गेल्या चार दिवसापासून पिक विमा भरण्यासाठी सरकारची वेबसाईट योग्यप्रकारे चालत नसल्याने शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. बीड तालुक्यातील वांगी गावचे नामदेव कोंडवे गेल्या तीन दिवसापासून सीएससी सेंटरवर पिक विमा भरण्यासाठी चकरा मारत आहेत. मात्र, पीक विमा भरण्यासाठीची वेबसाईट चालत नसल्याने त्यांना दिवसभर सीएससी सेंटरवरच बसून राहाव लागतं आहे.
पिक विमा वेबसाईट सतत हँग
यावर्षी पहिल्यांदाच एक रुपयात पिक विमा भरून घेत जात असल्याने सर्वच शेतकरी पिक विमा भरण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे, सर्वच सीएससी सेंटरवर शेतकरी पिक विमा भरण्यासाठी गर्दी करत असले तरी, दुसरीकडे मात्र पीक विमा भरण्यासाठीची वेबसाईट सतत हँग होत असल्याने शेतकऱ्यांना दिवस-दिवस सीएससी सेंटरवर बसून राहावं लागत आहे. पिक विमा भरण्यासाठी 31 जुलै ही शेवटची तारीख असून या तारखेच्या आत शेतकऱ्यांना पिक विमा भरावा लागणार आहे.
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मुदतवाढीची मागणी
बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 17 लाख 9 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्यासाठी नोंदणी केली आहे. तर, अद्यापही जिल्ह्यातील 40 टक्के शेतकऱ्यांचा पिक विमा भरणे बाकी आहे, त्यामुळे बीड जिल्ह्यातीचच कृषिमंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांनी तात्काळ या प्रकरणात विशेष लक्ष देऊन पिक विमा भरण्यासाठी वेबसाईट सुरळीत करून पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पिक विमा वेबसाईट चालत नसल्याने लाखो शेतकरी संभ्रमित
बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी पावसानं मोठी उसंत दिल्याने अद्यापही जिल्ह्यात मोठा पाऊस झालेला नाही. तर, काही ठिकाणी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. त्यामुळे नुकसान झाल्यानंतर मदत मिळावी म्हणून मोठ्या प्रमाणात शेतकरी एक रुपयांमध्ये पिक विमा भरत आहेत. मात्र पीक विमा भरण्यासाठीची वेबसाईट चालत नसल्याने पिकाचं नुकसान झाल्यानंतर मदत कशी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
पिक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या चकरा
राज्यामध्ये एकूण एक कोटी 47 लाख शेतकरी आहेत यापैकी एक कोटी 17 लाख शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील उभे पिकाचा विमा उतरवला आहे. आणखी शेतकरी पिक विमा भरण्यासाठी रोज सीएससी सेंटरच्या चकरा मारत आहेत. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मात्र शेतकरी पिक विमा भरण्याविना राहणार नाही, असे आश्वासन दिलं आहे.
पिक विमा शेतकऱ्यांचा एकमेव आधार
जून महिन्यात हुलकावणी देणाऱ्या पावसाने अखेर जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सर्व दूर दमदार हजेरी लावली खरी मात्र, अद्याप राज्यातील बहुतांश भागातील पाण्याचा साठा वाढलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये हवामानाचा फटका शेतीला बसलाच तर, पिक विमा एकमेव आधार शेतकऱ्यांना असतो आणि त्यामुळेच विना अडथळा तो पिक विमा शेतकऱ्यांना मिळावा हीच अपेक्षा.
संबंधित इतर बातम्या :