Agriculture News: नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून लाचेची मागणी; व्हिडिओ होतोय व्हायरल
Agriculture News: अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी शेतकऱ्यांकडून लाचेची मागणी करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Agriculture News: अतिवृष्टीमुळे पीकाच्या नुकसानीमुळे आधीच अडचणीत झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामा करण्यासाठीदेखील लाच द्यावी लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या जिल्ह्यातील हा व्हिडिओ आहे.
हा व्हिडिओ अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथील असल्याचे म्हटले जात आहे. अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी सरकारकडून पंचनामे सुरू आहेत. नेवासे तालुक्यात पंचनामे करण्यासाठी दर एकर मागे 400 रुपयांची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. महसुल विभागाने नेमलेल्या पथकाकडून पैशांची मागणी करण्यात येत आहे. एका शेतकऱ्याने हा सगळा प्रकार व्हिडिओत कैद केला आहे. पंचनाम्यासाठी पैसे मागण्याच्या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी शेतकऱ्यांनी तलाठी आणि ग्रामसेवकाकडे कारवाईची मागणी केली आहे. व्हिडिओमध्ये काहीजण शेतकऱ्यांकडून पैसे मागत असल्याचे दिसत आहे. त्याशिवाय, ज्या शेतकऱ्यांनी पैसे दिलेत, त्यांच्या नावाची यादी असल्याचा दावा करण्यात आला आहे.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला होता. त्यानंतर त्यांनी पंचनामा करण्याचे आदेश दिले होते. पंचनामे पूर्ण झाल्याशिवाय शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. पंचनामे झाले नसल्याने शेतकरी मदतीपासून अद्यापही वंचित आहेत. मात्र, अस्मानी संकटामुळे आधीच नुकसान सहन करत असलेल्या शेतकऱ्यांना आता पंचनाम्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत. महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यातच पंचनामा करण्यासाठी पथकाकडून शेतकऱ्यांकडून पैसे मागण्यात येत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या परतीच्या पावसाने हाती आलेली पिके वाया गेली. खरीप हंगामाच्या पिकांना मोठा फटका बसला. आता रब्बीच्या हंगामासाठीची आर्थिक तजवीज कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. काही शेतकऱ्यांनी सावकारांकडून कर्ज घेऊन पेरणी सुरू केली आहे.
मराठवाड्यात 12 लाख 49 हजार 731 हेक्टरचे नुकसान
मराठवाड्यात परतीच्या पावसानं थैमान घातलं होतं. मोठा फटका येथील शेती पिकांना बसला होता. जून ते ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात 12 लाख 49 हजार 731 हेक्टरचे नुकसान झाले होते. यातून सावरत असतानाच सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पुन्हा झालेल्या अतिवृष्टीमुळे उरल्यासुरल्या पिकांचे देखील नुकसान झाले आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर या दोन महिन्यात मराठवाड्यात 17 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.