(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hingoli News: कापसाच्या वाती आणि सोयाबीनची माती! परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
Hingoli News: परतीच्या पावसामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परतीचा पाऊस मुसळधार झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
Hingoli News: परतीच्या पावसाने दिलेल्या तडाख्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने कापूस (Cotton Crop) आणि सोयाबीनच्या (Soybean) शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड केली जाते. यावर्षी चांगला भाव मिळणार, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापसाची सुद्धा मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. परंतु या दोन्हीही पिकांचे परतीच्या पावसाने आता मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कापसाच्या वाती आणि सोयाबीनची माती अशीच काय ते शेतकऱ्याच्या शेतातील पिकांची अवस्था आहे.
सुरुवातीला महागडी खत बियाणं खरेदी करून शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जोरदार झालेल्या पावसाने सुरुवातीपासूनच ही पिकं पावसाच्या कचाट्यात आली. मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान झाले तरीही शेतकरी उभे राहिले. परंतु आता सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतात उभी असलेली सोयाबीन आणि कापलेल्या सोयाबीनच्या सुड्या भिजवून गेल्या आहेत. तर अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे पाण्यातून सोयाबीन काढण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.
वेचणीला आलेल्या कापसाची काही वेगळी अवस्था नसल्याचे चित्र आहे. संपूर्ण कापूस पाण्यामुळे भिजल्याने कापसाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतातून निघणाऱ्या या उत्पादनावर दिवाळी सणाचे आर्थिक गणित अवलंबून असते. मात्र, आता ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतातून उत्पादन निघणार नसल्याने दिवाळी तरी साजरी कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस
मराठवाडा विभागाचे वार्षिक पर्जन्यमान 679 मिलिमीटर आहे, मात्र, यंदाच्या वर्षी या प्रमाणाच्या तुलनेत आतापर्यंत 772 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे 114 मिलिमीटर अधिकच्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.
मराठवाड्यात मागील तीन वर्षांपासून अतिवृष्टी होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर हेोत आहे. यंदा परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने कापूस वेचणीला असतांना पावसाने भिजला आहे. तर सोयाबीनला अधिकच्या पावसाने कोंब फुटत आहे.