Mango Prices Increase : अक्षय तृतीयेपूर्वीच आंब्याचे दर भिडले गगनाला, बाजारपेठेत आंब्याचा तुटवडा
सध्या बाजारपेठेत आंब्याला मोठी मागणी आहे. मात्र, अवकाळी पाऊस आणि हवामान बदलाचा आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. सध्या आंब्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
Mango Prices Increase : अक्षय तृतीया सणापूर्वी आंब्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सध्या बाजारपेठेत आंब्याला मोठी मागणी आहे. मात्र, अवकाळी पाऊस आणि हवामान बदलाचा आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. दरम्यान, धुळ्याच्या बाजारपेठेत आंब्याचा तुटवडा भासत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आंब्याचे दर मोठ्या प्रमाणात कडाडले आहे.
अक्षय तृतीया हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अक्षय तृतीया या सनाला आंब्याचे महत्त्व मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे बाजारात आंब्याची आवक देखील सुरु झाली आहे. परंतू धुळे जिल्ह्यात तीन ते चार महिन्यांमध्ये सातत्याने हवामानात बदल झाल्यामुळे या हवामान बदलाचा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. परिणामी बाजारामध्ये आंब्याचा तुटवडा जाणवू लागल्यामुळे आंब्याचे दर सध्या चांगलेच कडाडले आहेत. त्यामुळे अक्षय तृतीया या सणाच्या दिवशी सर्वसामान्यांना महागडा आंबा खरेदी करावा लागणार आहे.
सध्या बाजारामध्ये विक्रीसाठी आलेल्या बदाम जातीच्या आंब्याला प्रतिकिलोसाठी 140 रुपये मोजावे लागत आहेत. तर एक किलो केसर आंबा खेरदी करण्यासाठी 160 रुपये मोजावे लागत आहेत. अक्षय तृतीयाच्या सणाच्या वेळी हे दर आणखी वाढण्याची शक्यता आंबा विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला अक्षय तृतीया हा सण संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. चैत्र महिना संपल्यानंतर वैशाखाचा वणवा सर्वत्र पेटतो. अर्थात वैशाख महिन्यात उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या असतात. या अक्षय तृतीयेच्या सणाला माहेरवाशिणी माहेराला येतात आणि वैशाखाच्या वणव्यात माहेराचा गारवा अनुभवतात. अक्षय तृतीयेच्या सणाला ग्रामीण भागात विशेष महत्व आहे. यादिवशी पुरणाची पोळी आणि आंब्याचा रस असा बेत तयार केला जातो. तसेच कुटुंबातील मृत झालेल्या पितरांना या दिवशी नैवेद्य दाखवला जातो. खानदेशात अक्षय तृतीयेच्या दिवशी माहेरी आलेल्या माहेरवाशिणी झाडाला झोका बांधून गाणी गातात खेळ खेळतात. अक्षय तृतीयेपासून आंब्याचा रस खाण्यास ग्रामीण भागात सुरुवात केली जाते. त्यामुळे आंब्याला या सणाला विशेष महत्व आहे. मात्र यंदा अवकाळी पाऊस आणि हवामान बदलाचा फटका आंब्याच्या पिकांना मोठ्या प्रमाणावर बसला असून आंब्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे ग्रामीण भागात सर्वसामान्य नागरिकांना आंबे खरेदी करण्यासाठी खिशाला कात्री लावावी लागणार आहे. अक्षय तृतीयेच्या सणापूर्वीच आंब्याचे भाव 140 ते 160 रुपये किलो या दराने सुरु आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: