(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Damage to mango and cashew crops : कोकणात काही ठिकाणी अवकाळी पाऊस, लाखो हेक्टरवरील आंबा आणि काजुला फटका
काल कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात पावसानं हजेरी लावली. याचा मोठा फटका काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.
Damage to Mango and Cashew Crops : सध्या राज्यातील वातावरणात बदल होत असल्याचे चित्र दिसत आहे. काही ठिकाणी उष्णतेत वाढ झाली आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, काल कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात पावसानं हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचं प्रमाण अधिक जाणवलं. कणकवलीमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला आहे. याचा मोठा फटका लाखो हेक्टरवरील आंबा आणि काजू पिकाला बसला आहे. त्यामुळे तेथील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
असनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकणात वातावरणात बदल दिसून येत आहे. मागील दोन दिवसांपासून वातावरण ढगाळ आहे. राजापूर तालुक्यातील पूर्व भागात काल दुपारपासून वीज कट केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कर्नाटकच्या किनारपट्टीच्या काही भागात देखील ढगाळ आकाश राहण्याचा अंदाज सांगण्यात आला आहे. तसेच केरळ, पश्चिम मध्य प्रदेश आणि गुजरात लगतच्या काही भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यात कमाल तापमानात झालेल्या वाढीमुळं उन्हाच्या झळा वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच आज गुजरातमध्ये उन्हाची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुले कोकक आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे. आज सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर याठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे वाढतं तापमान आणि विषाणूजन्य आजारांमुळं होणारी पानगळ याचे संकट देखील शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.
आधीच अनेक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसत आहे. मागच्या काही दिवसापूर्वीच महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अवकाळी पावसामुळं कांदा, हरभरा, द्राक्ष, मका या पिकांचे नुकसान झाले होते. आता पुन्हा कोकणात अवकाळीचा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. काजू आणि आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: