(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एक नंबर! सांगलीच्या शेतकरी भावांनी शोधली द्राक्षाची नवी जात, केंद्र सरकारचे पेटंटही मिळालं
Grapes in Sangli: कवलापूरच्या पोतदार द्राक्ष उत्पादक बंधू शेतकऱ्यानी सिद्ध गोल्डन नावाने द्राक्षाची नवीन जात शोधत केंद्र सरकारचे मिळवले पेटंट
Grapes in Sangli: सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कवलापूर मधील पोतदार बंधूनी आपल्या द्राक्ष शेतीतील वर्षानुवर्षेच्या अनुभवावर आणि अभ्यासाच्या जोरावर द्राक्षाचं नवीन वाण विकसित केलेय. शशीदर पोतदार, रवींद्र पोतदार असे या दोन भावांची नावे आहेत. या दोघांनी सिद्ध गोल्डन नावाने द्राक्षाचं नवीन वाण विकसित केलं आहे. शिवाय केंद्र सरकारचे या सिद्ध गोल्डन नावाने पेटंट देखील मिळवले आहे. आता आपल्या 2 एकरात या पोतदार बंधूनी या सिद्ध गोल्डन जातीच्या वाणाची लागवड केलीय. जाडी आणि लांबी भरपूर, मनी ड्रापिंग कमी तसेच इतर द्राक्षच्या जातीपेक्षा या सिद्ध गोल्डन जातीच्या द्राक्षाना मिळणारा जादा दर , किंबहुना दुप्पट दर मिळतोय. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे सिद्ध गोल्डन नावाचे नवीन द्राक्षचे वाण फायदेशीर ठरणार आहे.
मिरज तालुक्यातील कवलापूर येथील रवींद्र आणि शशिन्द्र पोतदार या बंधूंनी द्राक्षाची ‘सिद्ध गोल्डन’ ही नवी जात विकसित केली आहे. त्याचे स्वामित्वहक्क (पेटंट)देखील मिळविले आहेत. पारंपरिक जातींपेक्षा अधिक दर्जेदार असणारे हा वाण बाजारात दुप्पटीने दर मिळवत आहे. पोतदार बंधू २० वर्षांपासून द्राक्षशेती करतात. चार एकर बागेत सुपर सोनाक्का जातीसह नेहमीच्या जातींची द्राक्षे पिकवतात. सुमारे दोन वर्षांपूर्वी एका द्राक्षवेलीवरील काही काड्या आणि द्राक्षमणी वेगळेच असल्याचे त्यांना जाणवले. त्या काड्या बाजूला काढून स्वतंत्र लागवड केली. अन्य वेलींसोबतच त्यांचीही छाटणी, औषध फवारणी, डोळेभरणी, डिपिंग आदी कामे केली. फुलोऱ्यानंतर द्राक्षमणी तयार झाले, तेव्हा वेगळेपणा स्पष्ट जाणवला. आकार, लांबी, गोडी, रसाचे प्रमाण, घडाला घट्ट धरून राहण्याची क्षमता या सर्वच बाबतीत ती द्राक्षे दर्जेदार असल्याचे आढळले.
पोतदार बंधूंनी गावचे ग्रामदेवत सिद्धेश्वर असल्याने पेटंटचे नामकरण ‘सिद्ध गोल्डन’ असे केले. सव्वाएकरमध्ये स्वतंत्र लावण केली. वर्षभरापासून उत्पादन सुरू झाले आहे. ही द्राक्षे निर्यातीच्या दर्जाची आहेत. शेतीत नवनवी संशोधने करणारे शेतकरी त्याचा मालकीहक्क कायम राखण्याविषयी उदासीन असतात. त्याचा मोठा आर्थिक फटका त्यांना बसतो. दुसराच कोणीतरी फायदा मिळवून जातो. पोतदार बंधूंनी मात्र चाणाक्षपणा दाखवत सिद्ध गोल्डनचे स्वामित्वहक्क मिळवले. केंद्र सरकारच्या प्लॅन्ट व्हरायटी रजिस्ट्रीकडे वर्षभर पाठपुरावा करुन नोंदणी केली. आठवडाभरापूर्वीच नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे. सिद्ध गोल्डन वाण निर्यातीच्या दर्जाचे आहे. चांगल्या दर्जामुळे बाजारात दुप्पट दर मिळवत आहे. बागेतील सर्वच घड आणि द्राक्षमणी एकसारख्या आकाराचे आहेत. नव्या वाणाचे कायदेशीर हक्क मिळविले आहेत, त्यासाठी द्राक्षसंशोधकांनी बागेची पाहणीही केली असे शशिंद्र पोतदार यांनी सांगितले.
सिद्ध गोल्डन जातीच्या द्राक्षाच्या जातीची काय आहेत वैशिष्ट्ये?
- रसाळ आणि गोड, गरही भरपूर
- जास्त लांबी, टोकाला आकर्षक गोलाई
- बाकी जातीच्या द्राक्षापेक्षा सिद्ध गोल्डन जातीच्या द्राक्षला जास्त दर मिळतो
- घडाला धरून राहण्याची क्षमता
- चमकदार आणि तजेलदार हिरवा रंग