(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Junnar Hapus : हापूस फक्त कोकणचाच, जुन्नरच्या हापूसला भौगोलिक मानांकन देण्यासाठी कोकणच्या शेतकऱ्यांचा विरोध
जुन्नरच्या हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण याला कोकणातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.
Junnar Hapus : पुणे जिल्ह्यातील जुन्नर भागातील हापूस आंब्याला स्वतःची वेगळी चव, आकार आणि वैशिष्ट्ये आहेत. पुराणकाळातील ग्रंथांमधे, त्याचबरोबर मध्ययुगीन कालखंडात आणि शिवकालीन ग्रंथात इथल्या आंब्याचे उल्लेख आहेत. याचा आधार घेऊन इथल्या आंब्याला भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण याला कोकणातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. हापूस हा फक्त कोकणचाच आहे, असं कोकणातील बागायतदारांचं म्हणणे आहे.
जुन्नर भागातील हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी शासनाकडून 30 लाख रुपयांच्या निधिची तरतूद करण्यात आली आहे. हैदराबादच्या राष्ट्रीय संस्थेत भौगोलिक मानांकन प्राप्त करण्यासाठी अर्ज देखील दाखल करण्यात आला आहे. पण याला कोकणातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. हापूस हा फक्त कोकणचा आहे असे येथील शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
जुन्नर भागातील हापूस आंबा चव, रंग, वास, रंग या सर्वच बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण आहे. पुराणकाळातील ग्रंथांपासून ते मध्ययुगीन आणि शिवकालीन ग्रंथांमधेही इथल्या आंब्याचे उल्लेख आहेत. याचाच आधार घेऊन इथल्या आंब्याला शिवनेरी हापूस म्हणून भौगोलिक मानांकन घेण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. शास्त्रज्ञांची टीम त्यासाठी काम करत आहे. हे भौगोलिक मानांकन प्राप्त झाल्यावर जुन्नरच्या पर्यटनात भर पडणार आहे.
छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी, ख्रिस्तपूर्व काळात सातवाहन साम्राज्याचा युरोपमधील रोमन साम्राज्यासोबत जिथून व्यापार चालायचा तो नानेघाट आणि निजामशाही आणि मुघल साम्राज्याच्या खाणाखुणा अंगावर वागवणारे भव्य महाल अशा बर्याच गोष्टी जुन्नर परिसराला वैशिष्ट्यपूर्ण बनवतात. आता यामध्ये इथल्या हापूस आंब्याची भर पडणार आहे. या जुन्नर आणि आंबेगाव परिसरात येणारा हापूस आंबा इतर ठिकाणी पिकणाऱ्या हापूस आंब्यापेक्षा निराळा आणि वैशिष्ट्यपूर्ण असल्याने त्याचे भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. भौगोलिक मानांकनाची ही प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्रावर सोपवण्यात आली असून त्यासाठी तीस लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: