(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sugarcane news : ऊस कारखान्याला जात नसल्यानं शेतकरी दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न, अतिरीक्त उसाचा प्रश्न गंभीर
जालना जिल्ह्यातही अतिरीक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारखान्याला ऊस जात नसल्यानं जालना जिल्ह्यातील शेतकरी दाम्पत्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला.
Farmer suicide attempt : सध्या राज्यात अतिरीक्त ऊस गाळपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील काही जिल्ह्यात अद्यापही ऊस शिल्लक आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जालना जिल्ह्यातही अतिरीक्त उसाचा प्रश्न झाल्याने शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत. कारखान्याला ऊस जात नसल्यानं जालना जिल्ह्यातील भोगाव येथील शेतकरी दाम्पत्यानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्यांच्या हातातील विषाची बाटली हस्तगत करुन त्यांना ताब्यात घेतल्यानं अनर्थ टळला आहे.
ऊस उत्पादक शेतकरी सुभाष सराटे आणि त्यांच्या पत्नी मीरा सराटे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी दाम्पत्याचं नाव आहे. सराटे यांचा 8 एकर ऊस आहे. मात्र, अद्याप उसाला तोडणी आली नाही. हा ऊस शेतात वाळत असल्यानं त्यांनी साखर कारखाना आणि जिल्हा प्रशासनाला लेखी विनंती केली. या विनंतीनंतर कारखान्यानं आश्वासन देऊन देखील ऊस न नेल्यानं या दाम्पत्याने हे टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान यावेळी त्या ठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत शेतकऱ्यांच्या हातातील विषाची बाटली काढून घेत त्यांना ताब्यात घेतल्यानं पुढील अनर्थ टळला.
गाळप हंगाम अंतिम टप्प्यात
यंदाचा उसाचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. हंगाम संपत आला तरी अद्याप राज्यातील काही जिल्ह्यामध्ये ऊस शिल्लक आहे. राज्यात अतिरीक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आमचा ऊस कारखान्याला जाणार की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. दरम्यान, राहिलेल्या या उसाचे गाळप या महिन्याच्या अखेरीस पूर्ण केले जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याचबरोबर 30 हून अधिक साखर कारखाने ऊस संपेपर्यंत कार्यरत राहतील अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मराठवाड्यात ऊस शिल्लक
महाराष्ट्रात दरवर्षी ऊस गाळप हंगाम साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरु होतो. हा हंगाम एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत चालतो. मात्र, यावर्षी उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे अतिरीक्त उसाच्या गाळपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अतिरीक्त शिल्लक ऊस असणाऱ्या महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांपैकी मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांचा समावेश आहे. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर ऊस शिल्लक आहे. गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसानंतर राज्यातील उसाच्या लागवडीखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्याच्या काही भागात यंदाचा ऊस गाळप हंगाम हा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरु राहू शकतो अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Sugarcane : 17 महिने पूर्ण झाले तरी उसाला तोड नाही, वसमत तालुक्यात 2 कारखाने असूनही अतिरीक्त उसाचा प्रश्न
- Sugarcane News : शेतकऱ्यांची चिंता वाढली, महाराष्ट्रात 17.5 लाख टन ऊस शिल्लक, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कारखाने सुरु राहणार