Ethanol Production : हरियाणा सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील प्रत्येक साखर कारखान्यात उभारणार इथेनॉल प्लांट
Ethanol : इथेनॉलबाबत हरियाणा (Haryana) सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व साखर कारखान्यांमध्ये आता इथेनॉल प्लांट उभारण्यात येणार आहे.
Ethanol Production : साखर उत्पादनाच्या (Sugar Production) बाबतीत भारत हा जगातील एक मोठा उत्पादक देश आहे. देशात मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड केली जाते. साखरेचं अतिरीक्त उत्पादन झाल्यामुळं कारखानदारांनी इथेनॉलच्या निर्मितीवर (Ethanol Production) भर द्यावा असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. इथेनॉलबाबत हरियाणा (Haryana) सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व साखर कारखान्यांमध्ये आता इथेनॉल प्लांट उभारण्यात येणार आहे. त्यामुळं इथेनॉलच्या उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढणार आहे.
देशातील अनेक राज्यात मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड केली जात आहे. त्यामुळं साखरेच्या उत्पादनातही वाढ होत आहे. साखरेचं अतिरीक्त उत्पादन झालं आहे. त्यामुळं कारखानदारांना इथेनॉल निर्मितीचा सल्ला सरकारनं दिला आहे. काही साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती सुरु केली आहे. अशातच हरियाणा सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्वच साखर कारखान्यावर इथेनॉल प्लांट उभारण्यात येणार आहे. त्यामुळं इथेनॉलच्या उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढणार आहे. राज्यात 11 सहकारी साखर कारखाने आहेत. या सर्वच साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल प्लांट उभारला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हरियाणामध्ये साखर कारखान्यांची संख्या वाढत आहे. तसेच साखरेच्या उत्पादनातही हळूहळू वाढ होत असल्याचे सहकार मंत्री डॉ. बनवारी लाल म्हणाले. सध्या शाहबाद साखर कारखान्यावर राज्यातील एकमेव इथेनॉल प्लांट सुरू आहे.
शेतकर्यांना 263 कोटी रुपयांची देणी अदा
शेतकऱ्यांच्या ऊसाची रक्कम अदा करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे मत सहकारमंत्री डॉ. बनवारी लाल यांनी सांगितले. राज्य सरकार प्रत्येक शेतकऱ्याचे पैसे देत आहे. राज्यातील 80 टक्के शेतकऱ्यांना 263 कोटी रुपयांचा ऊसाचा मोबदला देण्यात आला आहे. जे शेतकरी उरले आहेत. त्यांनाही लवकरच पैसे दिले जातील असं मंत्री बनवारी लाल यांनी सांगितले. सध्या हरियाणात ऊसाचा भाव 372 रुपये प्रतिक्विंटल आहे. त्याच वेळी, राज्य सरकार इथेनॉल उत्पादनाला चालना देण्यासाठी कसरत करत आहे. यावेळी इथेनॉलचे उत्पादन घटले असल्याने आता ते वाढवण्यासाठी प्रत्येक साखर कारखान्यात इथेनॉलचे संयंत्र उभारले जाणार आहेत.