Budget 2021 Agriculture Sector Expectations: कृषी क्षेत्रात सुधारणांची गरज, अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा
Union Budget Agriculture Sector Expectations: कोरोना काळातही कृषी क्षेत्राने चांगला विकास केला आहे असं आर्थिक पाहणी अहवालात सांगितलं आहे. आता अर्थसंकल्पातही या क्षेत्राला मोठ्या अपेक्षा आहेत.
नवी दिल्ली: कोरोना काळात कृषी क्षेत्राने चांगली कामगिरी केल्याचं देशाच्या आर्थिक पाहणी अहवालात सांगण्यात आलं आहे. या क्षेत्राचा आता एका व्यवसायाच्या रुपात विकास करण्यात यावा असंही सुचवलं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात कृषी क्षेत्रामध्ये तात्काळ सुधारणा करण्याची गरज असल्याचं सांगण्यात आलं आहे.
भारतीय कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या बदलाची आवश्यकता असल्याचं मत आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी व्यक्त केलं होतं. आता आर्थिक पाहणी अहवालातही त्यावर भर देण्यात आलाय. त्यामुळे येत्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी काही सुधारणांची घोषणा करण्यात येईल असं सांगण्यात येतंय.
आर्थिक पाहणी अहवालात असं सांगण्यात आलंय की या क्षेत्रात शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. त्यासाठी ग्रामीण कृषी विद्यालयांची स्थापना करण्यात यावी अशी सूचना करण्यात आली आहे. पशुपालन, मत्स्यपालन आणि इतर क्षेत्रं ही रोजगाराची एक महत्वपूर्ण क्षेत्र म्हणून विकसित होत असल्याचं सांगण्यात येतंय.
Budget 2021: अर्थसंकल्पाबद्दल प्रत्येकाला माहित असाव्यात अशा या अकरा रंजक गोष्टी
आर्थिक पाहणी अहवालात असं सांगण्यात आलं आहे की कोरोनाच्या काळात इतर क्षेत्रांमध्ये मंदी आली असताना कृषी क्षेत्राने चांगली कामगिरी केली आहे. येत्या वर्षात या क्षेत्राचा 3.4 टक्के दराने विकास अपेक्षित आहे. नव्या कृषी कायद्यामुळे या क्षेत्राचा कायापालट होईल अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
देशाचा विकास व्हायचा असेल तर ग्रामीण भागाचा विकास होणं आवश्यक आहे. ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर कृषी क्षेत्राचा विकास करणं आवश्यक आहे. त्यासाठी भारतातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्याची आवश्यकता आहे. या दोन प्रकारच्या शेतकऱ्यांची संख्या 85 टक्के इतकी आहे. त्याच्या विकासासाठी दीर्घकालीन योजना राबवणे आवश्यक आहेत.
केंद्र सरकारने तीन नवे कृषी कायदे केले आहेत. ते कायदे शेतकऱ्यांच्या विकासासाठी गरजेचे आहेत असं केंद्र सरकार जरी सांगत असंल तरी या विरोधात भारतीय शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. या पार्श्वभूमीवर येत्या अर्थसंकल्पाकडून कृषी क्षेत्राला मोठ्या अपेक्षा आहेत.
Budget 2021 | अर्थसंकल्पाच्या आधी येणारा आर्थिक पाहणी अहवाल का असतो महत्वाचा? जाणून घ्या सविस्तर...