(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मंत्र्यांनी नुकसानीच्या पाहणीसाठी यावं की नाही हा त्यांचा प्रश्न, मी राजवाडा सोडून शेतकऱ्याच्या बांधावर आलोय : संभाजीराजे
Sambhaji Raje in Beed : माजी खासदार छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांनी आज बीड जिल्ह्यातल्या अतिवृष्टीची पाहणी करुन जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांची भेट घेतली.
Sambhaji Raje in Beed : माजी खासदार छत्रपती संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी आज बीड (Beed) जिल्ह्यातल्या अतिवृष्टीची पाहणी करुन जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांची भेट घेतली. माजी खासदार संभाजीराजे हे पावसामुळे पडलेले सोयाबीन (Soybean) घेऊन जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
गेल्या चार दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने थैमान घातलं आहे तरी देखील अद्याप एकही मंत्री आणि बीडचे पालकमंत्री अतुल सावे हे नुकसानीची पाहणी करण्यासाठी बीड जिल्ह्यात आले नाहीत. याबाबत संभाजीराजे छत्रपती यांना विचारलं असता ते म्हणाले की, "नुकसान पाहणीसाठी यावं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र मी राजवाडे सोडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेत आहे."
बीड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी तात्काळ मदत जाहीर करा : संभाजीराजे
परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यात मोठे नुकसान झालं आहे. त्यामुळे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या विशेष बाबीतून बीड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी तात्काळ मदत जाहीर करावी, असे देखील संभाजीराजे म्हणाले. दरम्यान आज (20 ऑक्टोबर) होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारकडून शेतकऱ्यांना मोठी मदत मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
बीडमध्ये परतीच्या पावसाचं थैमान, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातलं असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे कापूस तसंच सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तर मांजरसुंबा पाटोदा या रस्त्याचं नव्याने काम झालं असून यावर नाले नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे.
फळबागांना मोठा फटका
बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे फक्त सोयाबीन, कापूस या पिकालाच फटका बसला नाही तर फळबागांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. चार दिवस पडलेल्या पावसामुळे गेवराई तालुक्यातील मोसंबीच्या फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. तोडणीला आलेल्या मोसंबीच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ झाली असून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. जास्तीच्या पावसामुळे सोयाबीन आणि कापसाचं तर नुकसान झालेच पण फळबागा देखील या पावसामुळे उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे फळबागांचे देखील पंचनामे करुन या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.