Beed Farmers News : बीडच्या महानंद दूध संघानं थकवले दूध उत्पादकांचे पैसे, शेतकऱ्यांवर पडतोय आर्थिक ताण
बीडच्या शेतकऱ्यांना महिना उलटून गेला तरी दुधाचे हक्काचे पैसे मिळाले नाहीत. बीडच्या महानंद दूध संघाने अद्याप शेतकऱ्यांचे पैसे दिले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
Beed Farmers News : शासकीय डेअरीला दूध घातल्यानंतर दर दहा दिवसाला त्या दुधाचे पैसे शेतकऱ्यांना मिळतात. मात्र, बीडच्या शेतकऱ्यांना महिना उलटून गेला तरी दुधाचे हक्काचे पैसे मिळाले नाहीत. बीडच्या महानंद दूध संघाने अद्याप शेतकऱ्यांचे पैसे दिले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. महिनाभरापासून शेतकऱ्यांना दुधाचे पैसे मिळाले नसल्यानं आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना दुधाचे पैसे मिळणार कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बीड जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे पैसे महानंदा दूध संघाने थकवल्यानं गेल्या एक महिन्यापासून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळं दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. बीडच्या जिल्हा सहकारी दूध संघाला दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना दर दहा दिवसाला पैसे दिले जातात. मात्र, एप्रिल महिन्यापासून महानंदा दूध संघानं पैसे थकवल्यानं दूध घालूनही शेतकऱ्यांना अद्याप एक रुपयाही मिळालेला नसल्याचे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितलं.
बीड जिल्हा दूध संघाला 90 ते 100 संस्था दूध पुरवठा करतात. या संघाकडून शेतकऱ्यांच्या दुधाला 31 ते 33 रुपयापर्यंतचा भाव दिला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी या संघात आपलं दूध घालतात. दररोज 19 हजार लिटर दूध महानंदा दूध संघाला पाठवलं जातं. मात्र एप्रिल महिन्यापासूनच महानंदांने बीड जिल्हा सहकारी दूध संघाचे पैसे थकवले आहेत.
बीड जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण याच दूध संघावर अवलंबून आहे. दहा दिवसाला पैसे मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा दुधाचा व्यवसाय सुरळीत चालू होता. मात्र, आता जनावरांच्या खाद्य पेडींचे भाव वाढले आहेत. वाहतुकीसाठी देखील जास्तीचा खर्च होत आहे. त्यातच दूध संघाने पैसे थकवल्यानं दूध उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढांवल आहे. पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय खात्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे अदा करण्यासाठी पंधरा कोटी रुपयांचा निधी महानंदा दूध संघाला दिला आहे. तरी देखील महानंदा दूध संघाकडून बीड जिल्हा सहकारी दूध संघाला दूध उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी अद्याप कुठलाच निधी मिळालेला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या:
- Inflation : महागाईचा परिणाम! आता दुधासह सर्व दुग्धजन्य पदार्थ महाग होऊ शकतात
- Milk Price : गायीच्या दुधाला किमान 42 रुपये प्रति लिटर भाव द्या; दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची मागणी