(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wheat Procurement : गहू खरेदीत 42 टक्क्यांची वाढ, पंजाब हरियाणा आघाडीवर; काही भागात अवकाळीचा फटका
Wheat Procurement: सध्या शेतकरी गव्हाची काढणी करत आहेत. अशातच पाऊस आणि गारपीट होत असल्यानं पिकाचं नुकसान होत आहे. अशातच दुसरीकडे सरकारकडून गहू खरेदीला (Wheat Procurement) वेग आला आहे.
Wheat Procurement: देशभरात सध्या वातावरणात बदल (Climate Change) होत आहे. अनेक राज्यात अवकाळी पावासह (Unseasonal rain) गारपीट होत असल्याचे चित्र आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसत आहे. सध्या शेतकरी गव्हाची काढणी करत आहेत. अशातच पाऊस आणि गारपीट होत असल्यानं पिकाचं नुकसान होत आहे. दरम्यान, सध्या अवकाळी पाऊस पडत असला तरी सरकारकडून गहू खरेदीला (Wheat Procurement) वेग आला आहे. मागील वर्षीपेक्षा गहू खरेदीत 42 लाख टनांची वाढ झाली आहे.
गहू खरेदीत मोठी वाढ
सध्या उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि गारपीट सुरु आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. अशा स्थितीत सरकारकडून मोठ्या प्रमाणात गहू खरेदी सुरु आहे. 25 एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात 1.84 कोटी टन गव्हाची खरेदी झाली आहे, तर गेल्या वर्षी 25 एप्रिलपर्यंत 1.42 कोटी टन गव्हाची खरेदी झाली होती. यंदा 42 लाख टन अधिक गव्हाची खरेदी झाली आहे. ही वाढ एकूण गहू खरेदीच्या 29.5 टक्के आहे. यंदा देशात 3.42 कोटी टन गहू खरेदीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.
हरियाणा, पंजाबमध्ये गव्हाची खरेदी वाढली
हरियाणा आणि पंजाबमध्ये गव्हाच्या खरेदीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हरियाणातील 8.22 लाख शेतकऱ्यांकडून गहू खरेदी करण्यात आली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेही पाठवले जात आहेत. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 39,050 कोटी रुपये पाठवले जाणार आहेत. त्याचवेळी, गेल्या वर्षी 25 एप्रिलपर्यंत हरियाणात 36.8 लाख टन गव्हाची खरेदी झाली होती. यावेळी हा आकडा 52 लाख टनांच्या पुढे गेला आहे. राज्यात गव्हाचा एमएसपी 2,125 रुपये प्रति क्विंटल आहे. त्याचबरोबर पंजाबमध्ये यंदा गहू खरेदीत 7 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षी 25 एप्रिलपर्यंत 78.4 लाख टन गव्हाची खरेदी झाली होती, ती यंदा 83.6 लाख टन झाली आहे. पंजाबमध्ये 1.32 लाख टन गहू खरेदीचे लक्ष्य निश्चित करण्यात आलं आहे.
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातही गव्हाची खरेदी वाढली
उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातही गव्हाच्या खरेदीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मध्य प्रदेशात 25.8 लाख टन गव्हाची खरेदी झाली होती, ती यंदा 46.2 लाख टन झाली आहे. राज्यात 80 लाख टन गहू खरेदीचे उद्दिष्ट आहे. उत्तर प्रदेशातही गव्हाची खरेदी वाढली आहे. गेल्या वर्षी 25 एप्रिलपर्यंत यूपीमध्ये 88158 टन गव्हाची खरेदी झाली होती. यंदा हा आकडा 94633 टनांवर गेला आहे. एकूण 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. राजस्थानमध्ये 25 एप्रिलपर्यंत 38,124 टन गव्हाची खरेदी करण्यात आली आहे. राजस्थान आणि बिहारमध्येही गव्हाची खरेदी वाढली आहे. गेल्या वर्षी 25 एप्रिलपर्यंत राजस्थानमध्ये 37387 टन गव्हाची खरेदी झाली होती. यंदा गव्हाच्या खरेदीत 737 टनांची वाढ झाली असून, हा आकडा 38124 टनांवर पोहोचला आहे. चंदीगडमध्ये 7270 टन गव्हाची खरेदी करण्यात आली आहे. बिहारमध्येही 184 टन गव्हाची खरेदी करण्यात आली आहे. सर्व राज्यांमध्ये जास्तीत जास्त गहू खरेदी करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.
महत्त्वाच्या बातम्या: