VSI : गुजरातमध्ये उभारणार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं उपकेंद्र, शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय
गुजरातमध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (Vasantdada Sugar Institute) नवीन उपकेंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Vasantdada Sugar Institute : गुजरातमध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (Vasantdada Sugar Institute) नवीन उपकेंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुजरात आणि खानदेशच्या सीमावर्ती भागातील साखर उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (VSI) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच कार्यकारी मंडळाची बैठक पार पडली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
उपकेंद्र उभारणीची प्रक्रिया सुरू करावी, शरद पवारांच्या सूचना
शरद पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वात दरवर्षी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी मंडळाची बैठक होत असते. यंदाही नुकतीच कार्यकारी मंडळाची बैठक पार पडली. ही बैठक पुण्यातील मांजरी इथं झाली. यामध्ये VSI चे नवीन उपकेंद्र गुजरातमध्ये उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, उपकेंद्रासाठी नियामक मंडळाचे सदस्य, VSI मधील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने जागांची पाहणी करावी, उपकेंद्र उभारणीची प्रक्रिया सुरू करावी, अशा सूचना शरद पवार यांनी केल्या आहेत. व्हीएसआयमध्ये ग्रीन हायड्रोजन निर्मितीचा पथदर्शक प्रकल्प उभारण्याच्या सूचनाही शरद पवार यांनी दिल्या आहेत. त्यासाठी 75 लाख रुपये खर्च करण्यास नियामक मंडळाने मान्यता दिली आहे.
नागपूरमध्येही VSI च्या उपकेंद्राचं काम सुरु
नागपूरमधील बुटीबोरी भागात 115 एकरांवर VSI चे संशोधन केंद्र साकारले जात आहे. सध्या या जागेतील 40 एकरांवर सोयाबीन आहे. पुढील टप्प्यात येथे ऊसाच्या नवनवीन जातींची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही ऊस उद्योगात संशोधन करणारी महत्वाची संस्था
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पूर्वाश्रमीची डेक्कन शुगर इंस्टीट्यूट ही महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांनी एकत्र येऊन साखर उद्योगाशी निगडीत स्थापन केलेली संस्था आहे. ऊस उद्योगाच्या संदर्भात शास्त्रीय, तांत्रिक आणि शैक्षणिक संशोधन करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. 19 नोव्हेंबर 1975 ला वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटची स्थापना करण्यात आली होती. 385 एकरच्या परिसरात या संस्थेचे कामकाज चालते.
बैठकीला सर्वपक्षीय नेते उपस्थित, मात्र अजित पवारांची अनुपस्थिती
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र बैठकीला येण्याचे टाळले. परंतु, विधिमंडळातील कॉंग्रेस पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, इंद्रजित मोहिते, माजी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या: