Dragon Fruit : पारधी समाजातील तरुणानं शोधली नवी वाट, आनंदवाडीच्या माळरानावर फुलवलं 'ड्रॅगन फ्रुट'
पारधी समाजातील एका सुशिक्षित तरुण शेतकऱ्याने दीड एकर माळरानावर ड्रॅगन फ्रुट (Dragon Fruit) फुलवले आहे.
Dragon Fruit : यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याला शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखले जाते. याच जिल्ह्यात पारधी समाजही वास्तव्यास आहे. त्यांच्यावर लागलेला गुन्हेगारीचा शिक्का अजूनही पुसला गेला नाही. परंतू, याच पारधी समाजातील एका सुशिक्षित तरुण शेतकऱ्याने दीड एकर माळरानावर ड्रॅगन फ्रुट (Dragon Fruit) फुलवले आहे. आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी हा तरुण रोल मॉडेल ठरत आहे. अमोज चव्हाण (Amoj Chavan) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. दिग्रस तालुक्यातील आनंदवाडी येथील पारधी बेड्यावरील हा रहिवासी आहे.
ड्रॅगन हे फळ अनेक आजारांवर तसेच त्वचेसाठी गुणकारी आहे. आपल्याकडे सहसा या पिकाचं उत्पादन घेतलं जात नाही. मात्र, यवतमाळ जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्यानं माळरानावर ड्रॅगन फ्रुट फुलवले आहे. अलीकडच्या काळात शेतकरी शेतात नव-नवीन प्रयोग करत आहेत. मग, सफरचंदाची शेती, केसर आंब्याची शेती असो किंवा स्ट्रॉबेरीची शेती, रेशीम शेती करत आहे. नव्या दमाच्या अनेक शेतकर्यांनी प्रयोग यशस्वी करुन भरघोस उत्पन्न घेतलं आहे. अमोज चव्हाण या तरुण शेतकऱ्यानेही माळरानावर 'ड्रॅगन फ्रूट'ची शेती फुलवून शेतकर्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
ड्रॅगन फ्रुट हे हलक्या प्रतीच्या जमिनीतसुद्धा चांगले येते
ड्रॅगन फ्रुट हे अमेरिकेतील वाळवंटी भागात आढळते. हे फळ बाहेरुन गुलाबी रंगाचे असते. तर आत पांढरा गर असतो. खासकरुन हिंगोली जिल्ह्यात अनेक शेतकर्यांनी ड्रॅगनची शेती केली आहे. अमोज यांनी किवी वर्गातील असलेले हे फळपीक मुरमाड आणि हलक्या प्रतीच्या जमिनीतसुद्धा चांगले येत असल्याचे सांगितले. इतर पिकांच्या तुलनेत त्याला पाणीही कमी लागते. दोन वर्षांपूर्वी ड्रॅगनची फळबाग फुलवण्याचा निर्णय घेतल्याचे अमोज यांनी सांगितले.
पिकाची कालमर्यादा 30 वर्षे
कर्नाटकातील अकोले या गावावरुन ड्रॅगनच्या कलमा आणल्या होत्या. दीड एकर शेत जमिनीत 550 बेड तयार केले. त्यात कलमा लावल्या. दीड वर्षे देखभाल करुन ड्रॅगनची फळबाग फुलवली. पहिल्या तोडणीलाच तीन क्विंटल फळे निघाली. त्याला बाजारात 16 हजार क्विंटलप्रमाणे भाव मिळून 48 हजार रुपये हाती आले. लागवडीपासून ते फळ निघेपर्यंत त्याला साडेपाच लाख रुपये खर्च आला. या वर्षी सुमारे 6 टन उत्पन्न अपेक्षित आहे. पहिल्याच वर्षी लागवडीचा खर्च निघून काही पैसे हातात उरणार आहेत. या पिकाची कालमर्यादा 30 वर्षे आहे. त्यामुळं या पिकाचे सलग तीस वर्षे उत्पन्न मिळणार आहे.
आरोग्यासाठी लाभदायी असलेली 'जम्बो रेड' प्रजातीची निवड
अमोजने सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केला आहे. ड्रॅगनच्या 150 पेक्षा अधिक प्रजाती असून अमोजने आरोग्यासाठी लाभदायी असलेली 'जम्बो रेड' प्रजातीची निवड केली आहे. वडिलोपार्जित 12 एकर शेती असलेल्या अमोज चव्हाणला लहानपणापासून शेतीची आवड आहे. त्याला त्याची पत्नी, आई-वडील व भावाची साथ लाभली आहे. त्याच्या कमी जागेत जास्त उत्पन्न घेणारे फळपीक घेतल्याने इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरत असल्याचे मत यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: