सकारात्मक... नांदेडमधील निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यानं फुलवला 'ड्रॅगन फ्रूट'चा मळा, पारंपरिक शेतीला फाटा देत यशस्वी प्रयोग
नांदेडमधील अर्धापूर तालुक्यातील निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यानं आपल्या शेतात नवीन प्रयोग केला आहे. पारंपरिक शेतीला फाटा देत यशस्वी प्रयोग करत 'ड्रॅगन फ्रूट' च्या शेतीचा मळा फुलवला आहे.
नांदेड : नांदेडमधील अर्धापूर तालुक्यातील निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यानं आपल्या शेतात नवीन प्रयोग केला आहे. पारंपरिक शेतीला फाटा देत यशस्वी प्रयोग करत 'ड्रॅगन फ्रूट' च्या शेतीचा मळा फुलविला आहे. ड्रॅगन फ्रूट महाराष्ट्रात अत्यंत दुर्मिळ असणारे पीक समजले जाते. साधारणपणे थायलंड या देशात याची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. थायलंडच्या धर्तीवर अर्धापूर तालुक्यातील लहान येथील सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी उत्तमराव इंगळे यांनी 'ड्रॅगन फ्रूट'ची शेती फुलवली आहे.
इंगळे सेवानिवृत्तीनंतर आपल्या कर्मभूमीत लहान येथे शेती करत आहेत. त्यांची परिसरात 18 एकर शेती आहे. त्यापैकी 2 एकर मध्ये त्यांनी आधुनिकतेला जोड देत ड्रॅगन शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. या पिकाची लागवड वेल स्वरूपाची असल्याने शेतात सिमेंटचे खांब उभे करून रोपांची लागवड केली जाते. लागवडीनंतर एका वर्षाला फळ धारणा सुरू होते. 20 ते 25 वर्षे याचं उत्पन्न घेता येते.
निवडुंगासारख्या दिसणाऱ्या काटेरी वेलीला साधारणपणे जुलै ते नोव्हेंबर दरम्यान फळे येतात. एका झाडापासून तयार वेलींना एका तोडणीस सहा ते आठ फळे येतात (एकूण 100फळे येतात). एका फळास त्यांच्या दर्जानुसार प्रती किलो साधारणपणे 100 ते 150 रुपये भाव मिळतो. हे फळ रोगप्रतिकारक शक्ती वाढविते, यामुळं पांढऱ्या पेशींची वाढ होते. यामुळे आरोग्यासाठी महत्त्वाचे समजले जात असल्याने बाजारात चांगली मागणी असते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते व पांढऱ्या पेशींचे प्रमाण वाढते यामुळे ड्रॅगन फ्रुट कोरोना आजारावर लाभदायी आहे.
इंगळे यांनी सांगितलं की, जुलै 2019 मध्ये रोपांची लागवड केल्यानंतर एक वर्षानंतर फळधारणेला सुरुवात होते. इंगळे यांनी लाल रंगाच्या फ्रुटची लागवड केली आहे. या पिकावर मुख्य करून लाल मुंग्या व बुरशी या रोगाचा प्रादुर्भाव होतो. परंतु, अत्यंत कमी खर्चाची फवारणी करून ते लवकर नष्ट होते. अन्य खर्च कमी असल्याने हे पीक परवडणारे आहे.
एका फ्रुटचे 400 ते 600 ग्रॅम वजन
दोन एकर क्षेत्रामध्ये दहा बाय आठ अशा पद्धतीने एकरी सिमेंटचे सहाशे पोल बसविण्यात आले आहेत. दोन एकर क्षेत्रामध्ये 4 हजार 800 झाडांची लागवड करण्यात आली आहे. एका फ्रुटचे 400 ते 600 ग्रॅम वजन आहे. ड्रॅगन फ्रुटला सांगली, कोल्हापूर, पुणे,हैदराबाद, नांदेड आदी ठिकाणी बाजार पेठेत चांगला भाव मिळतो. याचबरोबर परिसरातील नागरिकही मोठ्या प्रमाणात खरेदी करतात, असं इंगळे यांनी सांगितलं.
कमी खर्च होत असल्याने,आरोग्यासाठी लाभदायक असल्याने बाजारात मागणी आहे.कमी खर्चात उत्पन्नही चांगले मिळते. परिसरातील शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती करत आधुनिक शेतीकडे वळून उत्पन्नात वाढ करावी असे आवाहन डॉ. इंगळे यांनी शेतकऱ्यांना केलेय.