Bhandara Rain : भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसानं 310 हेक्टर शेतीचं नुकसान, 702 घरांची पडझड
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात अवकाळी पावसामुळं 310 हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान झालं आहे. तर जिल्ह्यातील 702 घरांची पडझड झाली आहे.
Bhandara Rain : राज्यातील काही भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) धुमाकूळ घातला आहे. काही भागात गारपीट देखील झाली आहे. यामुळं शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. भंडारा जिल्ह्याला देखील अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात अवकाळी पावसामुळं 310 हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान झालं आहे. तर जिल्ह्यातील 702 घरांची पडझड झाली आहे. त्यामुळं सरकारनं मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे.
सरकारनं मदत करावी शेतकऱ्यांची मागणी
मागील काही दिवसात भंडारा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा चांगलाच फटका जिल्हावासीयांना बसला आहे. 1 ते 3 मे या तीन दिवसांच्या कालावधीत वादळी वाऱ्यासह झालेली गारपीट आणि मुसळधार पावसानं जिल्ह्यात 702 घरांची पडझड झाली आहे. तर लाखनी तालुक्यात 310 हेक्टरपेक्षा अधिक शेतीचं नुकसान झालं आहे. या अवकाळीचा सर्वाधिक फटका लाखनी तालुक्याला बसला असून अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे. सततच्या नापिकीला तोंड देणाऱ्या बळीराजाला सावरण्यासाठी सरकारनं आर्थिक मदत तातडीनं द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस
राज्यातील नाशिक, नंदुरबार, नांदेड, लातूर, हिंगोली या भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. या मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. आधीच सातत्यानं बदलत जाणाऱ्या हवामानाचा फटका शेती पिकांना बसत असताना त्यात पुन्हा अवकाळी पावसानं भर घातल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिकं या पावसामुळं वाया जात आहेत.
फळबागांसह रब्बी पिकांचं मोठं नुकसान
नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात जोरदार अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. या अवकाळी पावसामुळे कांदा, भाजीपाला, आंबा तसेच फळबागांचेही नुकसान झाले आहे. जनावरांचा चाराही भिजल्याने पुढील काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट होणार असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड शहरात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे मुदखेड इथल्या नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं. मुदखेड शहरातील अनेक रस्त्यावर पाणी साचलं असून रेल्वेचे भुयारी मार्ग पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे मुदखेड शहरातील वाहतुकीचा खोळंबा झाला.
देशातील वातावरणात बदल
देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठे उन्हाचा कडाका तर कुठे अवकाळी पावसाची (Unseasonal rains) हजेरी लागत आहे. दिल्लीत गेल्या 15 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार मान्सूनपूर्वीच दिल्लीत 200 टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. दरम्यान, 7 मे पर्यंत दिल्लीत आकाश ढगाळ राहणार असून काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.