IND vs AUS, 2nd T20, Weather Report : भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या टी20 सामन्यावर पावसाचं सावट, हवामान विभागाकडून महत्त्वाची माहिती
IND vs AUS, 2nd T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडणारा आजचा दुसरा टी20 सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात पार पडणार आहे.
IND vs AUS, 2nd T20, Weather Report : ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तीन टी20 सामने खेळवले जात आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील दुसरा टी20 सामना महाराष्ट्रातील नागपूर शहरात खेळवला जाणार आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात पार पडणाऱ्या या सामन्यावर पावसाचं सावट निर्माण झालं आहे. कारण हवामान विभागाने आज (22 सप्टेंबर) आणि उद्या (23 सप्टेंबर) पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान उद्याच (23 सप्टेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया सामना सायंकाळी होणार असून याच दरम्यान पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यात बऱ्याच काळानंतर नागपूरात आंतरराष्ट्रीय सामना होत असून त्यावर पावसाचं सावट आल्यानं प्रेक्षकांची धाकधूक वाढली आहे.
पावसाचा हा अंदाज हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा क्षेत्र छत्तीसगडवर केंद्रीत आहे. 23 सप्टेंबरच्या सुमारास कमी दाबाचे क्षेत्र पूर्व मध्यप्रदेशावर केंद्रित राहील. मात्र त्याचा जोर कमी झालेला असेल असे अंदाज हवामान विभागाचे नागपूर येथील प्रादेशिक केंद्राचे संचालक मोहनलाल शाहू यांनी व्यक्त केले आहे. मात्र, तरीही 23 सप्टेंबर रोजी पूर्व मध्य प्रदेशातील कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून नागपूर आणि जवळपासच्या क्षेत्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. त्यात हा पाऊस संध्याकाळी राहू शकतो असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे उद्या संध्याकाळी होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी20 सामन्यावर पावसाचं सावट वावरत आहे. पावसामुळे भारतीय संघाचं सराव सत्रही रद्द झाल्याचं समोर आलं आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया Head to Head
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापंर्यंत 24 टी-20 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 13 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, ऑस्ट्रेलियाच्या संघाला 10 सामने जिंकता आले आहेत. यातील एक सामना अनिर्णित देखील ठरला.
संभाव्य भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.
संभाव्य ऑस्ट्रेलिया संघ - आरोन फिंच (कर्णधार), जोस इंगलिस, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), टिम डेविड, कॅमरून ग्रीन, एडम झम्पा, पॅट कमिंस, जोस हेजलवुड, सीन एबॉट.
महत्वाच्या बातम्या :