सत्यजितसिंह पाटणकरांनी सुरत गुवाहाटीचा मुद्दा काढला, शंभूराज देसाई विधानसभा निकालाचा दाखला देत म्हणाले, ...तर त्यांची रिक्षा आम्ही पलटी केली नसती
Shambhuraj Desai : "आम्ही गद्दारी केली असती तर विधानसभा निवडणुकीत अपक्ष सत्यजित पाटणकरांची रिक्षा आम्ही पलटी केली नसती" असा पलटवार शंभूराज देसाई यांनी पाटणकरांवर केला आहे.

सातारा : साताऱ्यातील दोन्ही राजेंच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केलेले सत्यजितसिंह पाटणकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली होती.शंभूराज देसाई यांनी पक्षाशी गद्दारी करून सुरत मार्गे गुवाहाटी पळून गेले अशी खोचक टीका पाटणकर यांनी केली होती. देसाई यांनी या आरोपांना उत्तर दिलं आहे.मी या पक्ष प्रवेशा बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहे.आम्ही कधीही गद्दारी केली नाही जो शिवधनुष्य बाण 1997 बाळासाहेब ठाकरे यांनी दिला तो आजही माझ्या हातात आहे, असं देसाई म्हणाले.
... तर पाटणकरांची रिक्षा पलटी केली नसती : शंभूराज देसाई
सत्यजितसिंह पाटणकर यांनीच आत्ता पर्यंत अनेक पक्ष बदलले आहेत.त्यांनी काँग्रेस ,राष्ट्रवादी पुन्हा अपक्ष परत मशाल आणि आता कमळ हातात घेतले आहे.आम्ही गद्दारी केली असती तर विधानसभा निवडणुकीत अपक्ष सत्यजित पाटणकरांची रिक्षा आम्ही पलटी केली नसती, अशी खोचक टीका करत पाटणकरांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
गद्दारी करुन गुवाहाटीला जायचं कारण काय होत?: सत्यजितसिंह पाटणकर
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर पाटणचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले.भाजप पक्षप्रवेशावरून शंभूराज देसाई गटाकडून होणाऱ्या टीकेला सत्यजित पाटणकरांनी उत्तर दिले होते. आम्ही छत्रपतींच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश केला. तुम्ही पक्षाशी गद्दारी करून गुवाहाटी सुरतला पळून जाण्याच काय कारण होतं असा सवाल शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांना विचारला आहे. शंभूराज देसाई आणि शिंदेंच्या शिवसेनेवर भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सत्यजित पाटणकर यांनी तोफ डागल्याने पाटणला महायुतीत जुंपणार असल्याचे चित्र दिसत आहे.
देसाईंची कोंडी करण्याचा प्रश्न नाही : आशिष शेलार
सत्यजित पाटणकर यांच्या भाजप प्रवेश नंतर शिंदे गटाच्या शिवसेनेचे शंभूराज देसाई यांची कोंडी होण्याचा प्रश्न उद्भवत नाही.. ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अनुभवी आहेत त्यांना सोडा त्यांच्या पक्षालाही अडचणीत आणण्याचा कोणताही प्रश्नच उद्भवत नाही. शिवसेना आणि भाजपमध्ये धूसपूस नाही मात्र चर्चा सुरू आहे. मतप्रदर्शन जरूर सुरू आहे हा तर लोकशाहीचा पाया आहे. यामध्ये गैरसमज होणार नाहीत याची आम्ही दक्षता घेऊ, असं आशिष शेलार साताऱ्यात म्हणाले होते.


















