New Zealand vs Sri Lanka : किवी आक्रमणासमोर श्रीलंकेचं अवघ्या 171 धावांत लोटांगण
न्यूझीलंडनं श्रीलंकेचा पाच विकेट्स आणि तब्बल १६० चेंडू राखून पराभव करून विश्वचषकाच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आपला पहिला दावा सांगितला. विश्वचषकाच्या गुणतालिकेत चौथं स्थान पटकावून उपांत्य फेरीचं तिकीट मिळवण्यासाठी न्यूझीलंड आणि पाकिस्तान या दोन संघांत मोठी चुरस आहे. न्यूझीलंडनं श्रीलंकेवर मोठ्या फरकानं विजय मिळवून आपला नेट रनरेट आणखी उंचावला आहे. त्यामुळं पाकिस्तानला अखेरच्या साखळी सामन्यात इंग्लंडवर आणखी मोठ्या फरकानं विजय मिळवावा लागणार आहे. दरम्यान, बंगळुरूतल्या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी श्रीलंकेचा अख्खा डाव १७१ धावांत गुंडाळून निम्मी लढाई जिंकली. न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्टनं तीन, तर लॉकी फर्ग्युसन, मिचेल सॅन्टनर आणि रचिन रवींद्रनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. त्यानंतर न्यूझीलंडच्या डेवॉन कॉनवेनं ४५, रचिन रवींद्रनं ४२ आणि डॅरिल मिचेलनं ४३ धावांची खेळी करून आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.