Mithali Raj : मिताली राजचा नवा विक्रम; 20 हजार धावा पूर्ण करणारी पहिली महिला क्रिकेटर
Mithali Raj : भारतीय महिला एकदिवसीय क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजनं इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात मितालीनं 61 धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान तिनं एक नवा विक्रम केला आहे. मितालीनं क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये मिळून 20 हजार धावांचा पल्ला गाठला आहे. हा विक्रम करणारी ती जगातील एकमेव महिला क्रिकेटर आहे.
मिताली राजनं 217 एकदिवसीय सामन्यांमध्ये 7304 धावा केल्या आहेत. तर 11 कसोटी सामन्यांमध्ये 669 धावा केल्या आहेत. कसोटीत तिची सर्वाधिक धावसंख्या 214 आहे. याशिवाय 89 टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये मितालीने 2364 धावा केल्या आहेत.टी-20 फॉरमॅटमध्ये मितालीने 17 अर्धशतके झळकावली आहेत. स्थानिक क्रिकेटमध्ये देखील मितालीनं धावांचा पाऊस पाडला आहे. या सर्व प्रकारांमध्ये तिनं वीस हजार धावा पूर्ण केल्या आहेत. तिच्या या विक्रमाबद्दल बीसीसीआयनं तिचं अभिनंदन केलं आहे.