(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kabul Airport Blast : बॉम्बस्फोटानं काबुल हादरलं; 72 हून अधिक मृत्यू, आयसिसनं स्विकारली जबाबदारी
Kabul Airport Blast : अफगाणिस्तानच्या काबुल विमानतळावर गुरुवारी झालेल्या दोन स्फोटांमुळे किमान 72 लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. तालिबानने या स्फोटांचा निषेध केला असून या स्फोटांची जबाबदारी ISIS-K (आयएसआयएस-खुरासाना) या दहशतवादी गटाने स्वीकारली आहे. या दहशतवाद्यांना आम्ही माफी करणार नसून त्यांना याची किंमत चुकवावी लागेल अशा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिला आहे.
ISIS-K (आयएसआयएस-खुरासाना) या दहशतवादी गटाने आपल्या टेलिग्राम अकाऊंटवरुन या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत असल्याचं जाहीर केलं. गुरुवारी रात्री काबुल विमानतळावर झालेल्या दोन स्फोटांमध्ये किमान 60 अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाला असून 150 हून जास्त नागरिक जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. या व्यतिरिक्त 11 अमेरिकन सैनिकांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे. मृतांच्या आकड्यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
अमेरिकन अध्यक्ष ज्यो बायडेन म्हणाले की, "आम्ही या हल्लेखोरांना माफी करणार नाही, या हल्लाला जशास तसं उत्तर देणार आहे. अफगाणिस्तानमधून अमेरिकन नागरिकांना सुरक्षित परत आणण्याची मोहीम सुरुच राहणार आहे."