Pune Demu Train Fire : दौंडहून पुण्याला येणाऱ्या ट्रेनच्या डब्याला आग, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
Pune Train Fire : दौंडहून पुण्याला येणाऱ्या डेमू (DEMU) ट्रेनमध्ये सोमवारी सकाळी एक थरारक घटना घडली. सकाळी 07:05 वाजता दौंडवरून निघालेल्या शटल ट्रेनच्या एका डब्यातील टॉयलेटमध्ये अचानक आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेमुळे ट्रेनमध्ये काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
डेमू (DEMU) ट्रेनच्या टॉयलेटमध्ये आग लागली त्याचवेळी एक प्रवासी आत होता. दुर्दैवाने दरवाजा लॉक झाल्यामुळे तो बाहेर पडू शकत नव्हता. काही वेळातच टॉयलेटमधून धूर बाहेर येऊ लागला आणि आतमधील व्यक्तीचा आरडा-ओरडा ऐकू येऊ लागला. हे लक्षात येताच गाडीत असलेल्या काही सतर्क प्रवाशांनी प्रसंगावधान राखत त्या दरवाज्याकडे धाव घेतली. यानंतर काही प्रवाशांनी टॉयलेटचा दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांनी दरवाजा तोडून अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवण्यात आला.
तातडीने दिली स्टेशन मास्तरला माहिती
घटनेची माहिती प्रवाशांनी तातडीने स्टेशन मास्तरला दिली. आग आटोक्यात आणण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात आले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे आग लागणे ही गंभीर बाब असून रेल्वे प्रशासनाने अशा घटनांना रोखण्यासाठी यंत्रणांची तातडीने तपासणी करावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.























